आठवडाभरात कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या तिप्पट – जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

जीनिव्हा/रोम/वॉशिंग्टन – जगभरातील कोरोनाव्हायरच्या बळींची संख्या 15,337 वर गेली आहे. तर या साथीची लागण झालेल्यांची संख्या साडेतीन लाखांच्याही पुढे पोहोचली. गेल्या आठवडाभरात या साथीच्या बळींची संख्या तिप्पट झाल्याचे, तर याची लागण झालेल्यांची संख्या दुपटीने वाढल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने बजावले आहे. याचे सर्वाधिक बळी इटलीमध्ये गेले असून अशीच भयंकर परिस्थिती आपल्या देशावर ओढावू नये, यासाठी जगभरातील नेते आपल्या जनतेला घराबाहेर न पडण्याचे कळकळीचे आवाहन करीत आहेत.

इटलीमध्ये या साथीचे 5500हून अधिक बळी गेले आहेत. इटलीतील या साथीचे केंद्र मानल्या जाणार्‍या लोंबार्डी शहरातील शवागरांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. क्षमता संपल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे इथल्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. मात्र इतकी दारूण परिस्थिती असूनही इटलीतील जनता सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास तयार नाही. इटलीच्या किनार्‍यावर मौजमस्ती करणार्‍या महाभागांच्या संख्येत अजूनही घट झालेली नाही. याचे व्हिडिओ प्रसिद्ध करून इटलीच्या विविध प्रांतातील मेअर्सनी जगभरातील जनतेला, निदान तुम्ही तरी अशी चूक करू नका, असा हेलावून टाकणारा संदेश दिला आहे.

इटलीच्या हॉस्पिटलमधील आयसीयू बेडस् 92 टक्के इतक्या प्रमाणात भरून गेले आहेत. तर काही प्रांतांच्या हॉस्पिटल्समध्ये आयसीयू बेडस् कमी पडत असल्याचे समोर येत आहे. यानंतरही इटलीचे नागरिक सरकारच्या सूचना धुडकावत असल्याची भयंकर बाब या निमित्ताने समोर आली आहे. तर स्पेनमध्ये पंतप्रधान पेड्रो सँचेझ यांनी नॅशनल इमर्जन्सी आणखी 15 दिवसांनी वाढविण्याची घोषणा केली. गेल्या 24 तासात स्पेनमध्ये 394 जणांचा बळी गेला असून या साथीमुळे आत्तापर्यंत स्पेनमध्ये 2,182 जण दगावले आहेत. या साथीचे इटली व चीननंतर सर्वाधिक बळी स्पेनमध्ये गेले आहे. या देशातील नागरिकही बेजबाबदारपणाचे प्रदर्शन करीत असून सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहेत. स्पेनमध्ये लॉकडाऊन केल्यानंतरही बिनधास्तपणे बाहेर भटकणार्‍या काही बेपर्वा नागरिकांना अटक करण्यात आल्याच्या बातम्या आल्या आहेत.

कोरोनव्हायरसचा फैलाव वाढलेल्या ब्रिटनमध्ये देखील कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. ही साथ थैमान घालत असतानाही लंडनच्या मेट्रो स्टेशनवर गर्दी दिसत असून जनतेला रोखण्यात पोलीस दलही अपयशी ठरले आहे. यामुळे आणता लष्कराची तैनाती करण्याचा निर्णय ब्रिटनच्या सरकारकडून घेतला जाऊ शकतो.

अमेरिकेच्या सुमारे 34 प्रांतांमध्ये मिळून 471 जण दगावले आहेत. अमेरिकेत या साथीचे सुमारे 35,200 रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेच्यासारख्या प्रगत आरोग्यसेवा असलेल्या देशानेही या साथीचा सामना करताना खूप मोठी आव्हाने समोर येत असल्याचे मान्य केले आहे. अमेरिकन लष्कराने न्यूयॉर्कमध्ये हॉटेल्स व रेस्टॉरंटचे हॉस्पिटल्समध्ये रुपांतर करून कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत.

जपानमध्ये होणार्‍या ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळापत्रकावर या साथीचा परिणाम होणार नाही, अशी घोषणा जपानने केली होती. पण कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. दोन्ही देशांनी ऑलिंपिकसाठी आपले पथक पाठविणार नसल्याचे जाहीर केले आहे. तर ऑलिंपिक महासंघाने या स्पर्धेबाबत गंभीरपणे विचार करण्याची वेळ ओढावल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, चीनमधून आलेल्या एका बातमीने सार्‍या विश्‍लेषकांना भयचकीत केले आहे. चीनमधील मोबाईल व टेलिफोनधारकांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत दोन कोटी, दहा लाखांनी कमी झाल्याचे दिसते. ही घट निराळेच संकेत देत असून चीन कोरोनाव्हायरसच्या बळींची खरी संख्या दडवित असल्याचा आरोप एका पाश्‍चिमात्य वृत्तपत्राने केला आहे.

leave a reply