कोव्हॅक्सिनला पुढील महिन्यात डब्ल्यूएचओकडून मान्यता मिळणे अपेक्षित

- परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

मान्यतानवी दिल्ली – कोरोनावरील भारतीय व्हॅक्सिन असलेल्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही. डब्ल्यूएचओकडून कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आलेली नसल्याने कित्येक देशांनीही कोव्हॅक्सिनला मान्यता दिलेली नाही. मात्र डब्ल्यूएचओकडून पुढील महिन्यात कोव्हॅक्सिनला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे. त्याचवेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सोमय्या स्वामिनाथन यांच्याशी चर्चा केली. यावेळीही कोव्हॅक्सिनला मान्यता देण्याबाबत चर्चा पार पडली आहे.

कोव्हॅक्सिनने लसीला मान्यता मिळावी यासाठी 9 जुलै रोजी डब्ल्यूएचओकडे प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी आवश्‍यक सर्व अहवाल व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. साधारणपणे प्रस्ताव आल्यानंतर त्याची समिक्षा करून सहा ते आठ आठवड्यात लसीच्या आपत्कालीन वापराबाबत मंजुरीचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे सप्टेंबरमध्ये कोव्हॅक्सिनला डब्ल्यूएचओ मंजुरी मिळेल अशी अपेक्षा असल्याचे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. दुसरीकडे राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी कोव्हॅक्सिन सध्या डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन वापराच्या लसींच्या यादीत नाही याची सरकारला पुर्ण माहिती आहे, असे म्हटले आहे. सरकार कोव्हॅक्सिनला मंजुरी मिळावी यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. यासंदर्भातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे त्या म्हणाल्या.

दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिक सोमय्या स्वामिनाथन यांच्याशीही याबात चर्चा केली. केंद्रीय मंत्री मंडाविया यांनी स्वत: फोन करून याबाबतची माहिती दिली. भारताने यावर्षी 3 जानेवारीला कोव्हॅक्सिनला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती. चाचण्यांमध्ये ही लस 78 टक्के प्रभावी असल्याचे लक्षात आले होते. सध्या या लसीचा बुस्टर डोस देण्यासंदर्भातही चाचण्या सुरू आहेत. तसेच लहान मुलांसाठी ही लस देण्यासंदर्भातल्या चाचण्या पार पडल्या आहेत. याचे निष्कर्ष उत्सवर्धक असून कोव्हॅक्सिनचे लसींचे डोस दिल्यानंतर 56 दिवसाने मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲन्टीबॉडीज तयार झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या दोन महिन्यात 6 ते 12 आणि 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या झाल्या आहेत.

leave a reply