मॉस्को – युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाकडून इंधनाची खरेदी बंद करण्याच्या मोठमोठ्या घोषणा अमेरिकेसह युरोपिय देश देखील देत आहेत. रशियाकडून इंधनाची खरेदी करणाऱ्या भारत व चीनवर दबाव टाकण्याचे प्रयत्नही अमेरिका आणि युरोपिय देशांनी करून पाहिले. रशियाकडून इंधनाची खरेदी करणे म्हणजे युक्रेनच्या युद्धासाठी रशियाला पैसे पुरविण्यासारखेच ठरते, असा दावा युरोपिय देशांकडून करण्यात येत आहे. पण हे सारे दावे व आदर्शवादी भूमिका पोकळ असल्याचे दाखवून देणारे वृत्त जपानच्या ‘बिझनेस डेली निक्केई’ने प्रसिद्ध केले. यानुसार उघडपणे नाही, पण छुप्यारितीने युरोपिय देश ग्रीसच्या मार्गाने रशियन इंधनाची खरेदी करीत आहेत.
ग्रीसच्या सागरी क्षेत्रात इंधनाने भरलेली रशियन जहाजे दुसऱ्या जहाजात इंधन भरत आहेत. यापैकी एक ते दोन जहाजांचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. यामधले एक जहाज ग्रीसचे तर एक जहाज भारताशी निगडीत असल्याची माहिती जपानच्या ‘बिझ्ानेस डेली निक्केई’ने दिली. यापैकी एक फोटोग्राफ्स 24 ऑगस्ट रोजीचा आहे. अशारितीने ग्रीसचा वापर करून युरोपिय देश चोरट्या मार्गाने रशियाचे इंधन खरेदी करून आपली गरज भागवित आहेत. गेल्या वर्षी रशियाने ग्रीसला 4.34 दशलक्ष बॅरल्स इतके इंधनतेल पुरविले होते. मात्र यावर्षी हे प्रमाण 23.86 दशलक्ष बॅरल्सवर गेले असून एकाच वर्षात ग्रीसला इतक्या मोठ्या प्रमाणात रशियाने पुरविलेले इंधन निराळेच संकेत देत असल्याचा दावा ‘बिझ्ानेस डेली निक्केई’ने केला.
रशियन वृत्तसंस्थांनी ही बातमी उचलून धरली असून याद्वारे युरोपिय देशांच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले. याबरोबरच रशियाचे इंधन युरोपिय देशांपर्यंत चोरट्या मार्गाने पोहोचवून चीन आपले उखळ पांढरे करून घेत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अशारितीने छुप्या मार्गाने रशियन इंधनाची खरेदी करून इतरांना रशियन इंधनाची खरेदी करू नका, असा उपदेश करणाऱ्या युरोपिय देशांचे पितळ यामुळे उघडे पडले आहे. रशियाकडून आपण इंधनाची खरेदी करीत नसल्याचे दावे करणाऱ्या ब्रिटनमध्येही जून महिन्यात रशियाचे इंधन पोहोचले होते, अशी बातमी निक्केईने दिली आहे. त्यामुळे रशियाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या ब्रिटनच्या दाव्यांवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
युरोपिय देशांमध्ये हिवाळ्यात इंधनवायुची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. त्याच्या आधीच रशियाने युरोपचा इंधनावायू पुरवठा बंद केल्याने युरोपिय देशात खळबळ माजली आहे. या संकटावर मात करण्यासाठी पार पडलेल्या युरोपिय देशांची बैठक अपयशी ठरल्याचे दावे केले जातात. त्याचवेळी जर्मनीसारखा देश इंधनवायुचा वापर व वाटपाच्या मुद्यावर बेल्जियम, लक्झ्ोंबर्ग, नेदरलँड आणि पोलंड या शेजारी देशांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने संतापल्याच्याही बातम्या येत आहेत.