जगतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा समावेश असलेला तीन सदस्यांचा आयोग तयार करा

-मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांची मागणी

मेक्सिको सिटी – ‘चीन-तैवान आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव जगासाठी तापदायक ठरत आहे. यामुळे महागाईत अधिकच भर पडली असून पुरवठा साखळीही बाधित झालेली आहे. अशा परिस्थितीत निदान पुढच्या पाच वर्षांसाठी संघर्ष रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यामुळे रशिया व युक्रेनमध्ये संघर्षबंदी लागू होईल आणि त्यानंतर प्रक्षोभक कारवायांवरही नियंत्रण ठेवता येऊ शकेल. यासाठी तीन सदस्यांचा आयोग स्थापन करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँतोनियो गुतेरस आणि आदरणीय पोप फ्रान्सिस यांचा समावेश असावा’ अशी मागणी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्रादोर यांनी केली आहे.

Narendra-Modiफेब्रुवारी महिन्यापासून रशिया व युक्रेनचे युद्ध पेटले आहे. हे दोन्ही देश जगाला अन्नधान्याचा पुरवठा करणारे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भडकलेल्या युद्धामुळे कित्येक देशांचा अन्नधान्याचा पुरवठा थांबला आहे. इतकेच नाही तर इंधनासाठी रशियावर अवलंबून असलेल्या देशांचीही मोठी कोंडी झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर वाढले आहेत. श्रीमंत देशांच्या अर्थव्यवस्थांनाही या समस्येचा फटका बसला असून गरीब व विकसनशील देशांची अवस्था बिकट बनली आहे.

युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाच, अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी युक्रेनला भेट दिली. याविरोधात चीनने दिलेल्या इशाऱ्यांकडे पेलोसी व अमेरिकेनेही दुर्लक्ष केले होते. यामुळे खवळलेल्या चीनने तैवानसह अमेरिकेलाही युद्धाच्या धमक्या दिल्या आहेत. तैवानच्या क्षेत्रात युद्धसरावांचे आयोजन करून चीनने या क्षेत्रातील वातावरण स्फोटक बनविले आहे. तर चीनच्या चिथावणीमुळे उत्तर कोरिया देखील नव्या अणुचाचणीची तयारी करीत असल्याचे दावे केले जातात.

या साऱ्या घडामोडींचा विघातक प्रभाव देशांच्या अर्थव्यवस्थांवर पडत आहे. त्यामुळे भू-राजकीय पातळीवर सुरू असलेल्या या उलथापालथी रोखण्यासाठी अमेरिका, चीन व रशिया या देशांच्या नेत्यांना चर्चेचे आमंत्रण देऊन कुणीतरी त्यांना खडे बोल सुनवावेच लागतील. कारण या देशांनी गेल्या वर्षभरात स्वीकारलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जगासमोर भयंकर आर्थिक समस्या खडी ठाकली आहे. महागाई भडकली आहे आणि अन्नटंचाई व गरीबीचा प्रश्न अधिकच तीव्र बनला आहे. या भयंकर परिस्थितीमुळे कितीतरी जणांचा जीव जात आहे, ही बाब या तिन्ही देशांच्या नेत्यांच्या लक्षात आणून द्यायलाच हवी, असा दावा मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.

हे करण्यासाठी तीन सदस्यांच्या आयोगाची आवश्यकता आहे. यामध्ये ख्रिस्तधर्मियांचे धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांच्यासह संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँतोनियो गुतेरस यांचा समावेश मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. त्याचवेळी अमेरिका व रशिया या दोन्ही देशांशी उत्तम संबंध असलेल्या भारताच्या पंतप्रधान मोदी यांचाही या तीन सदस्यांच्या आयोगात समावेश करण्याची आग्रही मागणी राष्ट्राध्यक्ष ओब्रादोर यांनी केली. त्यांनी केलेले हे आवाहन उचलून धरले असून यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा वाढत असलेला प्रभाव नव्याने अधोरेखित झाला आहे.

leave a reply