युक्रेन व आखातातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर्स प्रति बॅरलवर

दुबई/लंडन – रशिया-युक्रेनसह आखात तसेच मध्य आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, कच्च्या तेलाच्या दरांनी ९० डॉलर्स प्रति बॅरलवर उसळी घेतली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१४ मध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९० डॉलर्स नोंदविण्यात आले होते. गेल्या काही महिन्यात इंधनाची मागणी वाढत असून त्या प्रमाणात पुरवठा वाढत नसल्यामुळे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था तसेच अभ्यासगटांनी कच्च्या तेलाचे दर नजिकच्या काळात १०० डॉलर्स प्रति बॅरलवर गेलेले दिसतील, असे भाकित वर्तविले आहे.

युक्रेन व आखातातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर्स प्रति बॅरलवरयुक्रेन व रशियामधील तणाव दिवसेंदिवस अधिकच चिघळत असून त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर उमटू लागले आहेत. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांनी जवळपास दोन टक्क्यांची उसळी घेत ९० डॉलर्स प्रति बॅरलवर झेप घेतली. गुरुवारी सकाळच्या सत्रात किंचित घसरण झाल्यानंतर पुन्हा एक टक्क्याची वाढ नोंदवित कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९०.८५ डॉलर्सवर पोहोचले. अमेरिकेतील ‘डब्ल्यूटीआय क्रूड’ तेलाचे दरही प्रति बॅरल ८८ डॉलर्सवर पोहोचले आहेत. हे दर ऑक्टोबर २०१४ नंतरचे सर्वाधिक दर असून सात वर्षातील नवा उच्चांक ठरला आहे.

कच्च्या तेलामध्ये होणार्‍या दरवाढीच्या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था तसेच अभ्यासगटांनी ही वाढ १०० डॉलर्सपर्यंत उसळी घेऊ शकते, याकडे लक्ष वेधले आहे. अमेरिकी वित्तसंस्था गोल्डमन सॅक्सने यासंदर्भात भाकित वर्तविले असून पुढील वर्षाच्या सुरुवातीला १०५ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत वाढ दिसून येईल, असे म्हटले आहे. युक्रेन व आखातातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर्स प्रति बॅरलवर‘अटलांटिक कौन्सिल ग्लोबल एनर्जी सेंटर’ने पुढील काही दिवस दर ८५ डॉलर्सच्या वर राहू शकतात, असा दावा केला आहे. तर ‘रायस्टड एनर्जी’च्या विश्‍लेषकांनी १०० डॉलर्स प्रति बॅरल वास्तवात उतरू शकते, याकडे लक्ष वेधले आहे.

कच्च्या तेलाच्या दरवाढीमागे रशिया-युक्रेन तणावाबरोबरच इतरही घटक कारणीभूत असल्याचा विश्‍लेषकांचा दावा आहे. युएईवर झालेले हौथींचे ड्रोन हल्ले, त्यानंतर येमेनमधील संघर्षाची वाढलेली तीव्रता, इराक-तुर्की इंधनवाहिनीची दुर्घटना आणि नायजेरिया व कझाकस्तानमधील अस्थैर्य यासारख्या गोष्टीही इंधनवाढीसाठी पूरक ठरल्या आहेत. त्याचवेळी ‘ओपेक’ व सहकारी देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्व देश अपेक्षित उत्पादन गाठू शकलेले नाहीत. त्यामुळे मागणी कायम असतानाही इंधनाचा पुरवठा मर्यादित राहिला आहे. याचा परिणाम पुढील काही काळ इंधन बाजारपेठेवर दिसून येईल, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply