मुंबई – अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने दोन वादळांची निर्मिती होत असून यातील एक वादळ ३ जून पर्यंत महाराष्ट्रासह गुजरातला धडकेल, असा इशारा हवामानखात्याने दिला आहे. आठवडाभरापूर्वीच पश्चिम बंगाल आणि ओडिशाला अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यानंतर आता पुन्हा वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पुढील २४ तासात दोन वादळे तयार होऊ शकतात. यातील एक वादळ पुढील ७२ तासात आफ्रिकेच्या तटावरुन ओमानमार्गे येमेनच्या दिशेने पुढे सरकेल. तर दुसरे वादळ भारताच्या दिशेने सरकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातला धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनवर त्याचा परिणाम होऊ शकतो का? याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मुंबई आणि महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टी क्षेत्रात ३ जूनपर्यंत मुसळधार पाऊस व जोरदार वारे वाहू शकतात असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
दरम्यान वादळाचा इशारा देण्यात आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पालघर व ठाणे जिल्ह्यातून मासेमारीसाठी गेलेल्या ४५५ मासेमारी बोटींना मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने माघारी बोलवले आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून देशाच्या दक्षिणेकडील राज्यात पाऊस पडत आहे, तर शनिवारी रात्री उत्तर भारतातील अनेक भागात हलक्या सरी पडल्या असून काही भागात मुसळधार पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातही कोकण, कोल्हापूरमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे.