वँगचुक यांच्या चिनी मालावर बहिष्काराच्या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद

लेह – लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर खडे ठाकलेले असताना लडाखच्याच ‘सोनम वँगचुक’ या पर्यावरण तज्ज्ञाने ‘ बॉयकॉट मेड इन चायना’चे आवाहन केले होते. ‘सेना देंगी बुलेट सें जबाब, नागरिक देंगे वॉलेट से’ अशा घोषवाक्याद्वारे वँगचुक यांनी देशवासियांना चिनी मालावर बहिष्काराचा संदेश दिला. भारतीयांकडून त्यांच्या या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Wangchukलडाखच्या सिंधू नदीच्या तीरावर बसून सोनम वँगचुक यांनी नुकताच एक व्हिडिओ तयार केला. येथून काही अंतरावरच भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर खडे ठाकले आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये दुरुनच ते ठिकाण दाखविले. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी देशवासियांना चिनी मालावर बहिष्कार घाला, असे आवाहन केले आहे. ”भारतीय पाच लाख कोटी रुपयांचा चिनी माल खरेदी करतात. भारतीयांचा हा पैसा चिनी सरकार शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी वापरते. हा पैसा भारतविरोधी कारवायांसाठी वापरला जातो. त्यामुळे भारतीयांनी ‘मेड इन चायना’ वर बहिष्कार घालावा. भारतीयांची ही ताकदच चीनला वठणीवर आणेल”, असा विश्वास वँगचुक यांनी व्यक्त केला.

”सध्या जगभरात चीनविरोधात असंतोष आहे. अशावेळी’ बॉयकॉट मेड इन चायना’ ही मोहीम तेवढ्यापुरतीच मर्यादित न राहता जगभरात याचा प्रसार व्हायला हवा. चीनच्या व्यापारालाच फटका बसला तर चीनची अर्थव्यवस्था डळमळेल”, असे वँगचुक यांनी म्हटले आहे. तसेच दोन टप्प्यात आपण भारतीय चिनी मालावर बहिष्कार टाकू शकतो. पहिल्या टप्प्यात भारतीयांनी आपल्या स्मार्टफोनमधील चिनी अँप डिलिट करावेत. तर दुसऱ्या टप्प्यात नागरिकांनी चीनी कंपन्याचे स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरचा बहिष्कार करावा. त्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला तरी हरकत नाही, असे वँगचुक यांचे म्हणणे आहे.

त्यांच्या या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद मिळात आहे. अनेक भारतीयांनी आपल्या स्मार्टफोनमधले अँप्स डिलीट केले. तसेच वँगचुक यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला. चिनी मालावर बहिष्काराचे आव्हान याआधीही झाले होते. मात्र काही दिवसातच अशा मोहीम थंडावल्या होत्या. ‘पुलवामा’सह भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडविणारा मौलाना मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यामध्ये चीन अडथळे आणत होता. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत चीनने आपला नकाराधिकार वापरून यासंबंधीचा प्रस्ताव रोखून धरला होता, त्यावेळीही असे आवाहन करण्यात आले होते. तसेच त्याआधी डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर खडे ठाकले असतानाही असेच आवाहन काही जणांनी केले होते. काही व्यापाऱ्यांनीही चिनी माल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर काही काळातच अशा मोहीम जोर ओसरला होता.

गेल्यावर्षी चीनच्या सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने यावरून भारतीयांची खिल्ली उडविली होती. अशा आवाहनानंतरही भारतात चिनी माल किती मोठ्या प्रमाणात विकला गेला, याचे दाखले या दैनिकाने दिले होते. भारतीयांना चिनी मालाशिवाय पर्याय नाही कारण भारताचे उत्पादन क्षेत्र खूपच मागासलेले आहे. भारत या आघाडीवर चीनची बरोबरी करू शकत नाही अशी दर्पोक्ती ग्लोबल टाईम्सने केली होती.

leave a reply