संरक्षणदलांमधील एकी वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे

- वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी

एकीचंदिगड – संरक्षणदलांची कुठलीही एक शाखा एकट्याने युद्ध जिंकू शकत नाही. त्यासाठी तिन्ही संरक्षणदलांना एकजुटीने कार्य करावे लागेल. म्हणूनच संरक्षणदलांमधील एकी अधिक दृढ करण्याचे काम सुरू झालेले आहे, असे एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी म्हटले आहे. वायुसेनेच्या 90 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना वायुसेनाप्रमुखांनी ही माहिती दिली. यावेळी वायुसेनेचा नवा ‘कॉम्बॅट युनिफॉर्म’ लाँच करण्यात आला. त्याचवेळी वायुसेनेच्या ‘वेपन सिस्टीम ब्रांच’ला केंद्र सरकारची परवानगी मिळाल्याची माहिती देऊन वायुसेनाप्रमुखांनी यामुळे सुमारे 3400 कोटी रुपयांचा प्रशिक्षणावरील खर्च वाचणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर फोर्स डेच्या निमित्ताने वायुसेनेला सदिच्छा दिल्या आहेत. कित्येक दशकांपासून देशाच्या संरक्षणाच्या आघाडीवर वायुसेना आपले कौशल्य प्रदर्शित करीत आली आहे, असे सांगून पंतप्रधानांनी वायुसेनेची प्रशंसा केली. तर या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समारोहाला संबोधित करताना वायुसेनाप्रमुखांनी तिन्ही संरक्षणदलांमधील संपर्क व समन्वय वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. संरक्षणदलांची कुठलीही एक शाखा युद्ध जिंकू शकत नाही, त्यासाठी तिन्ही संरक्षणदलांची एकजूट अत्यावश्यक असल्याचे सांगून वायुसेनाप्रमुखांनी या प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचबरोबर आधुनिक काळातील युद्धतंत्रात होत असलेले बदल व त्यानुसार वायुसेना घडवित असलेल्या सुधारणांचीही माहिती एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी यावेळी दिली.

‘ड्रोन्स, स्वार्म ड्रोन्स, हायपरसोनिक शस्त्रे आणि अंतराळ क्षेत्राशी निगडीत असलेली टेहळणी करणाऱ्या यंत्रणा, यामुळे आत्ताच्या काळातील युद्धतंत्र खूपच बदलले आहे. प्रचंड प्रमाणात मिळणाऱ्या माहितीचे (डाटा) विश्लेषण करण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून त्याचा वेगाने निर्णय घेण्यासाठी वापर केला जात आहे, अशी माहिती देऊन त्यावर वायुसेनाप्रमुखांनी समाधान व्यक्त केले. तसेच यासंदर्भात अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले असून डेटा ॲनॅलिटिक्स, ऑटोमेशन आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर वायुसेनेच्या मोहीमा राबविण्यासंदर्भातील संकल्पनांमध्ये सुधारणा घडविण्यासाठी केला जात आहे, असे वायुसेनाप्रमुख पुढे म्हणाले.

भूमी, सागर आणि हवाई क्षेत्राबरोबरच आता अंतराळ आणि सायबर क्षेत्राचाही सुरक्षेच्या आघाडीवर समावेश झालेला आहे. याचा हायब्रीड युद्धासाठी प्रभावीरित्या वापर केला जातो. ही बाब लक्षात घेतली, तर भविष्यातील युद्ध आधीच्या काळातील युद्धांसारखी लढता येणार नाहीत, हे मान्य करावे लागेल, अशी लक्षवेधी विधाने वायुसेनाप्रमुखांनी केली आहेत.

पुढच्या वर्षात वायुसेना तीन हजार अग्नीवीरांची भरती करणार असल्याची माहितीही यावेळी वायुसेनाप्रमुखांनी दिली. पुढच्या काळात ही संख्या वाढत जाईल, असा विश्वासही वायुसेनाप्रमुखांनी यावेळी व्यक्त केला. तसेच गेल्या वर्षात वायुसेनेसमोर फार मोठी आव्हाने खडी ठाकली होती आणि त्याचा वायुसेनेने आपल्या क्षमतेनिशी धैर्याने टक्कर दिली, असे सूचक विधानही यावेळी वायुसेनाप्रमुखांनी केले. स्पष्ट उल्लेख केला नसला, तरी लडाखच्या एलएसीजवळील हवाई क्षेत्रात चीनकडून काढल्या जाणाऱ्या कुरापतींचा संदर्भ वायुसेनाप्रमुखांनी दिल्याचे दिसते आहे.

एअर फोर्स डेच्या निमित्ताने वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती पार पडल्या. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व संरक्षणमंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते.

leave a reply