संरक्षण मंत्रालयाकडून ८७२२ कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला मंजुरी

नवी दिल्ली – संरक्षण मंत्रालयाकडून आठ हजार ७२२ कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्य खरेदीच्या प्रस्तावांना मंगळवारी मंजुरी देण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतेच देशांतर्गत संरक्षण साहित्याच्या निर्मीतीला चालना देण्यासाठी १०१ संरक्षण साहित्यांच्या आयातीवर बंदी आणणार असल्याची घोषणा केली होती. मंगळवारी संरक्षण मंत्रालयाच्या ‘डिफेन्स अ‍ॅक्विझिशन कौन्सिल’ने (डीएसी) ज्या प्रस्तावांना मंजुरी दिली यातील बहुतांश संरक्षण साहित्य हे देशी कंपन्या तयार करण्यात आहेत. यामध्ये वायुसेनेसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या १०६ ट्रेनर एयरक्राफ्टचा समावेश आहे.

Ministry-of-Defence‘डीएसी’ च्या बैठकीत संरक्षण साहित्याच्या खरेदीशी निगडित सुमारे ८७२२ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजुर करण्यात आले. यानुसार वायुसेनेच्या बेसिक ट्रेनींगच्या आवश्यकता पूर्ण करण्याकरिता १०६ बेसिक ट्रेनर विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. ही विमाने हिंदुस्थान एरोनॉटिक्स (हल) कडून बनविली जाणार आहेत. ‘हल’ने ‘एचएचटी-४०’ ही बेसिक विमाने ट्रेनर विमाने विकसित केली आहेत. पहिल्या टप्प्यात ७० एचएचटी-४०’ विमाने खरेदी केली जातील. त्यानंतर हा ताफा कार्यन्वित झाल्यावर आणखी ३६ विमाने ‘हल’ कडून घेण्यात येणार आहेत.

याशिवाय ‘सुपर रॅपिड गन माउंट’ ची (एसआरजीएम) अद्ययावत आवृत्ती नौदल आणि तटरक्षक दलासाठी खरेदी करण्यात येणार आहे. ‘भारत हेवी इलेकट्रोनिक्स लिमिटेड’कडून (भेल) या गन्स खरेदी करण्यात येतील. नौदलाच्या युद्धनौका आणि तटरक्षक दलाच्या गस्ती नौकेवर ‘एसआरजीएम’ बसविण्यात येणार आहेत. ‘एसआरजीएम’च्या अद्ययावत आवृत्तीत क्षेपणास्त्र आणि फास्ट अटॅक क्राफ्ट्स (एफएसी) सारख्या लक्ष्यांचा वेध घेण्याची क्षमता अधिक असल्याची महिती समोर येत आहे.

तसेच रणगाडे, लघु आणि माध्यम पल्ल्याच्या कॅलिबर शस्त्र प्रणालीमध्ये दारुगोळा म्हणून वापरात येणाऱ्या ‘आर्मर पियर्सिंग फिन स्टेबलाइज्ड डिस्क्राइबिंग साबोट’च्या (एपीएफएसडीएस) खरेदीलाही ‘डीएसी’ने मंजुरी दिली. लष्करासाठी ‘१२५ एमएम एपीएफएसडीएस’ची खरेदी करण्यात येणार आहे. खरेदी करण्यात येणाऱ्या या दारूगोळ्यामध्ये ७० टक्के भारतीय बनावटीच्या साहित्याचा समावेश असणार आहे. याशिवाय एके-२०३ रायफल्स आणि मानवरहित विमानांच्या अद्ययावतीकरणालाही ‘डीएसी’ मान्यता दिली आहे.

भारत आणि चीनमधील तणाव वाढल्यावर भारताने संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने संरक्षण साहित्यांच्या खरेदीला वेग दिला आहे. गेल्या महिन्यात ‘डीएसी’ने ३८ हजार ९०० कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याच्या खरेदीला मंजुरी दिली होती. यामध्ये रशियाकडून ३३ लढाऊ विमाने आणि नौदलासाठी अस्त्र क्षेपणास्त्रांच्या खरेदी प्रस्तावांचा समावेश होता. तसेच संरक्षणदलांच्या थेट संरक्षण साहित्य खरेदी करण्याच्या अधिकारातही वाढ करण्यात आली होती. यानुसार ३०० कोटी रुपयांपर्यंतच्या संरक्षण साहित्याची खरेदी आपत्कालीन स्थितीत तिन्ही संरक्षणदल आपल्या अधिकारात करू शकतात.

leave a reply