भारत व बांगलादेशचे संरक्षणविषयक सहकार्य महत्त्वाचे ठरते

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – बांगलादेशच्या ‘सशस्त्र वाहिनी दिवस’च्या निमित्ताने राजनैतिक शिष्टाचार बाजूला सारून सोमवारी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग नवी दिल्ली येथील बांगलादेशच्या उच्चायुक्तालयातील कार्यक्रमात सहभागी झाले. भारताचे संरक्षणदलप्रमुख तसेच तिन्ही संरक्षणदलांचे प्रमुख यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत या समारोहात सहभागी झाले. भारत व बांगलादेशच्या संरक्षणदलांचे सहकार्य दोन्ही देशांसाठी अतिशय संवेदनशील बाब ठरते, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

२१ नोव्हेंबर १९७१ रोजी सालच्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानी लष्कराबरोबर बांगलादेश मुक्ती वाहिनीची गरीबपूर येथे जबरदस्त चकमक झाली. इथूनच बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धाला चालना मिळाली आणि पुढे १६ डिसेंबर रोजी या युद्धात पाकिस्तान पूर्णपणे पराभूत झाला. म्हणूनच २१ नोव्हेंबर रोजी बांगलादेश ‘सशस्त्र वाहिनी दिवस’ साजरा करतो. यावर्षी बांगलादेशच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली असून यावर्षीच्या ‘सशस्त्र वाहिनी दिवस’चे महत्त्वही यामुळे वाढले होते. याचे औचित्य साधून भारताचे संरक्षणमंत्री नवी दिल्ली येथील बांगलादेशच्या उच्चायुक्तालयातील कार्यक्रमात सहभागी झाले.

भारत व बांगलादेशचे संरक्षणविषयक सहकार्य महत्त्वाचे ठरते - संरक्षणमंत्री राजनाथ सिंगबांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत भारताचे संरक्षणंमत्री तसेच तिन्ही संरक्षणदलांचे प्रमुख अशारितीने ‘सशस्त्र वाहिनी दिवस’च्या समारोहात उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे ही लक्षवेधी बाब ठरते, असा दावा माध्यमांकडून केला जातो. यावेळी भारत व बांगलादेशच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पुढच्या काळातही भारत बांगलादेशबरोबरील सहकार्य वाढवित राहिल, अशी ग्वाही दिली. ‘भारत आपल्या शेजारी देशांच्या सुरक्षेबाबत सजग राहणारा देश आहे. शेजारी देशांची सुरक्षा व त्यांचा विकास याबाबत भारत अतिशय संवेदनशील आहे. भारत व बांगलादेश खांद्याला खांदा भिडवून दहशवाद, कट्टरवाद यांच्याबरोबर गरीबी आणि उपासमार या समान आव्हानांचा सामना करीत आहे’, असे राजनाथ सिंग पुढे म्हणाले.

बांगलादेशचे स्वांतत्र्ययुद्ध म्हणजे २० व्या शतकातील असामान्य घटना ठरते. कारण हे युद्ध म्हणजे अन्याय, अत्याचार आणि दडपशाहीच्या विरोधात नैतिकतेचा संघर्ष होता. या युद्धात भारताने बांगलादेशला केलेल्या सहाय्याचे स्मरण बांगलादेशच्या संरक्षणदलांमध्ये सहभागी झालेल्या तरुणांना करून देणे महत्त्वाचे ठरतेे, यामुळे त्यांना नवी प्रेरणा मिळेल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग पुढे म्हणाले. याबरोबरच भारत सध्या बांगलादेशला करीत असलेल्या सहाय्याची माहिती संरक्षणमंत्र्यांनी यावेळी दिली. बांगलादेशच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारताने सुमारे ५० कोटी डॉलर्सचे कर्जसहाय्य पुरविले आहे. या अंतर्गत बांगलादेश भारताकडून संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रे खरेदी करू शकेल. या रक्कमेचा वापर करून बांगलादेश भारताबरोबर शस्त्रास्त्रांची व संरक्षणसाहित्याची संयुक्त निर्मिती आणि विकास यामध्येही सहभागी होऊ शकतो, असे राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.

चीन व तुर्की सारखे देश बांगलादेशबरोबर संरक्षणविषयक सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी उत्सुकता दाखवित आहेत. बांगलादेशचा भारताच्या विरोधात धोरणात्मक वापर करण्याची तयारी करून चीनने बांगलादेशात प्रचंड गुंतवणूक सुरू केली होती. या पार्श्‍वभूमीवर, बांगलादेशबरोबरील सहकार्य ही आत्ताच्या काळातही भारतासाठी फार मोठी सामरिक बाब ठरते. संरक्षणमंत्र्यांनी राजनैतिक शिष्टाचारांचा विचार न करता बांगलादेशच्या उच्चायुक्तालयात पार पडलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन, दोन्ही देशांमधील सहकार्य वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणूनच लक्षणीय ठरतात.

६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने बांगलादेशला मान्यता दिली होती व दरवर्षी ६ डिसेंबर हा भारत-बांगलादेश मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा मैत्री दिवस भारत व बांगलादेशबरोबरच आणखी १८ देशांमध्ये साजरा केला जाईल, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी दिली.

leave a reply