नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशातील सात राज्यात ‘बर्ड फ्ल्यू’मुळे पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याचे जाहीर केले, तसेच महाराष्ट्र आणि दिल्लीतील मृत पक्ष्यांच्या घेतलेल्या नमून्याचे अहवाल अद्याप आलेले नाहीत, अशी माहितीही केंद्र सरकारने दिली. ‘बर्ड फ्ल्यू’ पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात चिकन आणि अंड्याची मागणी ७० ते ८० टक्क्यांनी घसरली असून किंमती ५० टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्याचवेळी मटनाच्या किंमती ८०० रुपयांवर पोहोचल्या आहेत.
गेल्या काही दिवसात देशातील १० राज्यात मृत पक्षी आढळून आले आहेत. यातील सात राज्यातील मृत पक्ष्यांचे नमूने तपासल्यावर बर्ड फ्ल्यूचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि केरळचा समावेश आहे. तर महाराष्ट्र आणि दिल्लीतही काही भागात मृत पक्षी आढळून आले आहेत. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, दापोली, परभणी, बीड आदी जिल्ह्यांमध्ये कावळे, प्रवासी पक्षी आणि कोंेबड्या मृत आढळून आले होते. परभणीत शनिवारी ९०० कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. याशिवाय जम्मूमध्येही दोन दिवसांपूर्वी काही कावळे मृत आढळले होते. यामुळे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत बर्ड फ्ल्यूची भीती पसरली आहे.
दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. कोंबड्यांची विक्री बंद करताना ७ दिवसांसाठी बाजार बंद करण्याचे आदेश राज्य सरकारांनी दिले आहेत. देशात ‘बर्ड फ्ल्यू’चा फैलाव होत असल्याचे निष्पन्न होताच चिकन आणि अंड्यांची मागणी ७० ते ८० टक्क्यांनी घसरली आहे. चिकन आणि अंड्यांना उठावच नसल्याने त्यांच्या किंमती गेल्या तीन ते चार दिवसात ५० टक्क्यांनी घसरल्या आहेत.
यामुळे पोल्ट्री उद्योग संकटात सापडला आहे. रविवारी पोल्ट्री व्यवसायिकांच्या एका प्रतिनिधी मंडळाने केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेतली आणि ‘बर्ड फ्ल्यू’बाबत पसरणार्या अफवांना रोखण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले. तसेच ‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सुरक्षेची सर्व काळजी घेत असल्याचे म्हटले आहे.
गेल्यावर्षी कोरोनाव्हायरसच्या संकटाआधी देेशातील पोल्ट्री उद्योगाची उलाढाल १.२५ लाख कोटी इतकी होती. कोरोनाच्या संकटामुळे या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. तसेच उलाढालही निम्म्याने घटून ६० ते ७० हजार कोटी रुपयांपर्यंत खाली आली आहे. यामध्ये आता बर्ड फ्ल्यूमुळे या उद्योगाला आणखी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे व्यवसायिकांचे म्हणणे आहे. २००५ सालापासून दरवर्षी हिवाळ्यात पक्ष्यांमध्ये एव्हिएन इन्फ्लूएन्झा अर्थात बर्ड फ्ल्यूची साथ पसरत असल्याचे आढळून आले आहे. यावर्षी मात्र एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ आढळून येत आहे.