रशियाच्या ‘नॅशनल वेल्थ फंड’मधून अमेरिकन डॉलरची हकालपट्टी

मॉस्को – रशियन सरकारकडे असलेल्या राखीव गंगाजळीतून उभारण्यात आलेल्या ‘नॅशनल वेल्थ फंड’मधील अमेरिकी डॉलरचा हिस्सा शून्य करण्यात आला आहे. जानेवारी 2021मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘नॅशनल वेल्थ फंड’मधील 35 टक्के गुंतवणूक अमेरिकी डॉलर्समध्ये होती. मात्र आता या फंडमधून अमेरिकी डॉलरची कायमस्वरुपी हकालपट्टी करण्यात आली असून त्याऐवजी युआन, युरो व सोन्याचा हिस्सा वाढविण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही वर्षांपूर्वी ‘डिडॉलरायझेशन’ची प्रक्रिया सुरू केली होती. ‘नॅशनल वेल्थ फंड’मधील हिस्सा शून्यावर आणणे त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरतो.

रशियाच्या ‘नॅशनल वेल्थ फंड’मधून अमेरिकन डॉलरची हकालपट्टीदोन महिन्यांपूर्वी रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन यांनी, ‘नॅशनल वेल्थ फंड’ला सोन्यात गुंतवणूक करण्यास मंजुरी देणारा आदेश जारी केला होता. त्यानंतर जून महिन्यात रशियाचे अर्थमंत्री अँतोन सिल्युआनोव्ह यांनी, ‘नॅशनल वेल्थ फंड’मधून अमेरिकी डॉलर पूर्णपणे हटविण्याची घोषणा केली होती. ‘पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत नॅशनल वेल्थ फंडमधील डॉलरचा हिस्सा शून्यावर आणण्यात येईल. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी पावले उचलली जातील’, असे अर्थमंत्री अँतोन सिल्युआनोव्ह यांनी म्हटले होते.

या पार्श्‍वभूमीवर रशियाच्या अर्थ मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केले असून, नॅशनल वेल्थ फंडमधील अमेरिकी डॉलरचा हिस्सा 35 टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर आणल्याचे स्पष्ट केले. अमेरिकी डॉलरबरोबरच ब्रिटीश पौंडाचा हिस्साही पाच टक्क्यांपर्यंत खाली आणल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी युरो, युआन व सोन्यातील हिस्सा वाढविण्यात आला आहे. युरोचा हिस्सा 39.7 टक्के, युआनचा 30.4 तर सोन्याचा 20.2 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. जपानी येनचा वाटा 4.7 टक्के ठेवण्यात आला आहे.

रशियाच्या ‘नॅशनल वेल्थ फंड’मधून अमेरिकन डॉलरची हकालपट्टी‘रशियासाठी युआन व युरो ही चलने अमेरिकी डॉलरला पर्याय आहेत. ही दोन्ही चलने रशियाच्या प्रमुख व्यापारी भागीदार देशांची चलने आहेत. सोने ही अत्यंत महत्त्वाची मालमत्ता असून फंडातील गुंतवणुकीच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा घटक ठरतो’, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. ‘नॅशनल वेल्थ फंड’मधील डॉलरचा वाटा शून्यावर आणण्याची प्रक्रिया, ही गेल्या काही वर्षातील भूराजकीय घडामोडी व रशियन अर्थव्यवस्थेतील ‘डिडॉलरायझेशन’बाबत घेण्यात आलेले निर्णय यांना अनुसरून असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गेल्या काही वर्षात अमेरिकी डॉलरचा वापर कमी करण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. गेल्या वर्षीच त्यांनी रशियाच्या परकीय गंगाजळीतील अमेरिकी डॉलरचा हिस्सा कमी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, रशियाच्या मध्यवर्ती बँकेने अब्जावधी डॉलर्स कमी करून त्याचे प्रमाण 10 टक्क्यांच्याही खाली आणल्याचे सांगण्यत येते. या पार्श्‍वभूमीवर ‘नॅशनल वेल्थ फंड’मधून डॉलर पूर्णपणे काढून टाकणे लक्ष वेधून घेणारी घटना ठरते.

leave a reply