अत्याधुनिक विनाशिका ‘आयएनएस मोरमुगाओ’ नौदलात सहभागी

‘आयएनएस मोरमुगाओ’मुंबई – ‘आयएनएस मोरमुगाओ’ ही विशाखापट्टणम्‌‍ श्रेणीतील दुसरी विनाशिका भारतीय नौदलात सहभागी झाली. १६३ मीटर लांबीची, १७ मीटर रूंद आणि ७,४०० टन इतक्या वजनाची ही विनाशिका भारतीय नौदलात सहभागी झाल्याने, नौदलाची शक्ती अधिकच वाढेल, असा दावा केला जातो. देशी बनावटीच्या या युद्धनौकेसाठी ७५ टक्के इतक्या प्रमाणात देशातच तयार झालेल्या सुट्ट्या भागांचा वापर करण्यात आलेला आहे. याचा दाखला देऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ‘आएनएस मोरमुगाओ’ ही जगातील अत्याधुनिक ‘गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर’ असल्याचे म्हटले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार तसेच नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत ‘आयएनएस मोरमुगाओ’ नौदलात सहभागी करण्यात आली. नौदलाने हाती घेतलेल्या ‘१५बी’ प्रकल्पाच्या अंतर्गत विशाखापट्टणम श्रेणीतील चार विनाशिका नौदलाला मिळणार होत्या. ‘आयएनएस मोरमुगाओ’ ही या प्रकल्पातील दुसरी विनाशिका ठरते. ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ने ही विनाशिका उभारली आहे. गोव्यातील ऐतिहासिक बंदर मोरमुगाओवरून या विनाशिकेला सदर नाव मिळाल्याचे सांगितले जाते. १९ डिसेंबर २०२१ रोजी या विनाशिकेची पहिली सागरी चाचणी पार पडली होती. त्यानंतर वर्षभरात ही ‘आयएनएस मोरमुगाओ’ भारतीय नौदलात सहभागी झाली आहे.

‘आयएनएस मोरमुगाओ’‘आयएनएस मोरमुगाओ’वरील तोफा व इतर यंत्रणा अत्याधुनिक रडारयंत्रणांशी जोडलेल्या असून यामुळे या विनाशिकेवरून शत्रूवर अचूक मारा करता येऊ शकेल. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर तसेच पृष्ठभागावरून हवेत मारा करण्याची जबरदस्त क्षमता या विनाशिकेत आहे. तसेच ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र यंत्रणा या विनाशिकेवर तैनात करण्यात आलेली आहेत. आण्विक, रासायनिक व जैविक हल्ल्याला तोंड देण्याची क्षमता देखील ‘आयएनएस मोरमुगाओ’मध्ये आहे. तसेच पाणबुडीविरोधी युद्धात ही विनाशिका अतिशय प्रभावी कामगिरी करू शकते. कारण या विनाशिकेवर देशांतर्गत विकसित करण्यात आलेले रॉकेट लाँचर्स, टॉर्पिडो बसविण्यात आलेले आहेत. तसेच ‘आयएनएस मोरमुगाओ’वर हेलिकॉप्टर देखील तैनात केले जाऊ शकते.

‘आयएनएस मोरमुगाओ’ ही जबरदस्त क्षमता असलेल्या विनाशिकांपैकी एक असल्याचे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या विनाशिकेच्या सहभागामुळे भारतीय नौदलाची क्षमता अधिकच वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. ही विनाशिका संरक्षणसाहित्याच्या आघाडीवरील देशाच्या आत्मनिर्भरतेचे लखलखते उदाहरण ठरते. ही विनाशिका सध्या समोर असलेल्या व भविष्यातील धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचा दावा राजनाथ सिंग यांनी केला. या विनाशिकेची उभारणी करण्यासाठी अथकपणे परिश्रम करणाऱ्या इंजिनिअर्स, तंत्रज्ञ, डिझायनर्स आणि वैज्ञानिकांची संरक्षणमंत्र्यांनी प्रशंसा केली.

हिंदी महासागर क्षेत्रात देशाच्या हितसंबंधांचे संरक्षण करणे ही नौदलाची मुलभूत जबाबदारी ठरते. भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती देशाच्या वाढत्या व्यापाराशी थेटपणे जोडलेली आहे. हा व्यापार बहुतांश प्रमाणात सागरी मार्गानेच होतो. म्हणूनच भारताचे हितसंबंध हिंदी महासागराशी थेटपणे जोडलेले आहेत. या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा देश म्हणून हिंदी महासागर क्षेत्रातील भारताच्या नौदलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. अशा परिस्थितीत देशाचे नौदल आपल्यावरील ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत आहे, ही समाधानाची बाब ठरते, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग पुढे म्हणाले.

देशाच्या सीमा व सागरी सीमेच्या रक्षणासाठी संरक्षणदल करीत असलेल्या कामगिरीचेही संरक्षणमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. देशाच्या विकासात संरक्षणदलांचेही फार मोठे योगदान असल्याचा दावा यावेळी राजनाथ सिंग यांनी केली. देश दरदिवशी यशाची नवनवीन शिखरे सर करीत आहे. जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आता भारताचा समावेश झालेला आहे. पुढच्या पाच वर्षात भारत जगातील पहिल्या तीन क्रमांकाच्या अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असे मॉर्गन स्टॅनली या गुंतवणुकीसाठी ख्यातनाम असलेल्या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने म्हटले आहे, याकडे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले.

leave a reply