‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाअंतर्गत अंदमान-निकोबार बेटांचा विकास

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २,३०० किलोमीटर लांब 'ओएफसी'चे उद्‌घाटन

नवी दिल्ली – सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चेन्नई ते अंदमान-निकोबारपर्यंत २,३०० किलोमीटर लांब ‘सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल’चे (ओएफसी) उद्‌घाटन केले. यामुळे अंदमान-निकोबार बेटांना हायस्पीड इंटरनेट मिळेल. या बेटांवरील कनेटिव्हिटी वाढेल. याचा शिक्षण, पर्यटन आणि व्यवसायाला लाभ होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. तसेच हिंदी महासागर, इंडो- पॅसिफिक आणि भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाअंतर्गत अंदमान-निकोबार बेटाचे महत्त्व अधिकपटींने वाढले आणि वाढत राहणार आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. गेल्या काही वर्षांमध्ये चीनच्या या हिंदी महासागर क्षेत्रातील हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या बेटांचा विकास सामरिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

Andaman-Nikobar२०१८ साली पंतप्रधानांच्याच हस्ते ‘ओएफसी’च्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. बीएसएनएलने फार मोठे आव्हान स्वीकारुन समुद्राखालून या केबलच्या बांधकामाचे काम हाती घेतले. बीएसएनएलने अगदी वेळेत हे काम पूर्ण केले आहे. २,३०० किलोमीटर लांब ‘ओएफसी’चे हे नेटवर्क चेन्नईमधून पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअरपासून लिटिल अंदमान आणि पोर्ट ब्लेअरपासून स्वराज बेटापर्यंत असेल.

यामुळे पोर्टब्लेअरला प्रति सेकंद ४०० जीबीपीएस आणि इतर बेटांवर प्रति सेकंद २०० जीबीपीएस वेगाचे इंटरनेट उपलब्ध होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरील मोबाईल आणि लँडलाईन टेलिकॉम सेवा सुधारेल. तसेच अंदमान-निकोबार बेटांवरच्या पर्यटन व्यवसायाला या सुविधेचा फायदा होईल. तर ऑनलाईन शिक्षण, आरोग्य, ई- कॉर्मस, बँकिग, टेलिमेडिसिन याचा स्थानिकांना लाभ घेता येईल,असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

‘हिंदी महासागर हजारो वर्षे भारताचे व्यापार आणि सामर्थ्याचे केंद्र आहे. आता भारत ‘इंडो- पॅसिफिक’ क्षेत्रात व्यापार वाढवित आहे. नवे धोरण अवलंबित आहे. अशावेळी अंदमान-निकोबार सहित इतर बेटांचे महत्त्व वाढले आहे’, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. ‘ॲक्ट ईस्ट‘ धोरणाअंतर्गत भारताचे पूर्व आशियाई देशांसोबतचे आणि सागरी क्षेत्रातील देशांशी संबंध मजबूत होत आहेत. या बेटांचा विकास भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

दरम्यान, अंदमान- निकोबार बेटांवर इतर विकास प्रकल्पांचे काम सुरु असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. रस्ते, पाणी आणि हवाई मार्गाने अंदमान आणि निकोबार बेटांना उर्वरित भारताशी जोडले जाणार आहे. पोर्ट ब्लेअर इथे एअरपोर्टचे काम सुरू आहे. तसेच कोचीच्या शिपयार्डमध्ये चार जहाजांच्या बांधणीचे काम सुरु आहे. अंदमान- निकोबार पोर्ट डेव्हलपमेंट हब म्हणून विकसित होईल. तसेच या ठिकाणी ‘ट्रान्स शिपमेंट पोर्ट’च्या प्रस्तावाचे काम विचाराधीन आहे. त्यानंतर या ठिकाणी मोठमोठे जहाज थांबतील, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच या क्षेत्रात ‘ब्ल्यु इकोनॉमी’वर भर देणार असल्याचे पंतप्रधान म्हटले आहे.

leave a reply