इस्लामाबाद – पाकिस्तानातील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या २८१ वर गेली असून या साथीचे साडेतेरा हजाराहून अधिक रुग्ण पाकिस्तानात आहेत. पुढच्या काळात या साथीचा भयंकर विस्फोट पाकिस्तानात होईल, अशी भयावह शक्यता, या देशातील वैद्यकीय तज्ञ व पत्रकार वर्तवित आहेत. तसे झाले तर त्याला पंतप्रधान इम्रान खान यांचे धरसोडीचे धोरण जबाबदार असेल, असा इशारा इम्रान खान यांच्या विरोधकांबरोबरच त्यांचे समर्थकही देऊ लागले आहेत. कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना लॉकडाऊन करायचे की नाही, याबाबत पाकिस्तानचे सरकार अजूनही गोंधळलेले आहे, यामुळे पाकिस्तानचे लष्कर इम्रान खान यांच्यावर कमालीचे नाराज झाले असून लवकरच ही नाराजी इम्रान खान यांच्या सरकारला भोवणार असल्याचे दावे पाकिस्तानची माध्यमे करू लागली आहेत.
कोरोनाव्हायरसच्या साथीचा पाकिस्तानात शिरकाव झाल्यानंतर इम्रान खान यांनी त्वरित लॉकडाऊनचा निर्णय घेणे अपेक्षित होते. केवळ याच मार्गाने ही साथ रोखता येऊ शकते, असे पाकिस्तानी विश्लेषक व पत्रकार इम्रान खान यांना सातत्याने बजावत होते. मात्र पाकिस्तान सारख्या गरीब देशाला लॉकडाऊन परवडणार नाही. याने देशात उपासमार होईल, असा दावा करून इम्रान खान यांनी या मागणीला नकार दिला होता. त्यामुळे सारेजण लॉकडाऊन लागू करत असताना, पाकिस्तानात मात्र सारे व्यवहार सुरू होते. यामुळे पाकिस्तानात या साथीचा फैलाव वाढला असून आतापर्यंत या साथीने २८१ जणांचा बळी घेतला आहे. ही सरकारी आकडेवारी असली तरी, प्रत्यक्षात या साथीने याच्या कितीतरी अधिक पटींनी बळी घेतले आहेत. पण सरकार त्याची माहिती उघड करायला तयार नाही, असे आरोप होऊ लागले आहेत.
अशा परिस्थितीतही हटवादीपणासाठी मशहूर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लॉकडाऊन हे काही कोरोनाव्हायरसच्या साथीला उत्तर नाही, असाच दावा करीत आहेत. त्यामुळे पाकिस्तानात अधिकृतरित्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आले तरी पंतप्रधान इम्रान खान यांना ही कल्पना मान्य नसल्याचे चमत्कारिक चित्र या देशात दिसत आहे. संपूर्ण लॉकडाऊनच्या ऐवजी स्मार्ट लॉकडाऊन करायला हवा, असे इम्रान खान यांचे म्हणणे आहे. मात्र याचे तपशील त्यांनी उघड केलेले नाहीत. पंतप्रधानच या आघाडीवर उदासीनता दाखवत असल्यामुळे सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेकडून सोशल डिस्टन्ससिंग व आरोग्यविषयक खबरदारीची अपेक्षा ठेवता येणार नाही, अशी हताश प्रतिक्रिया पाकिस्तानच्या वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी देत आहेत.
ज्या गोरगरिबांचा हवाला देऊन पाकिस्तानचे पंतप्रधान लॉकडाउन करण्यास नकार देत होते, त्यांनाही आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविणे सरकारला जमलेले नाही. यामुळे पाकिस्तानात उपासमारीने बळी जात आहेत. शिवाय कोरोनाव्हायरसचा फैलावही थांबलेला नाही. त्यामुळे साथ रोखण्यात आणि उपासमार थांबवण्यात, अशा दोन्ही आघाड्यांवर इम्रान खान दारुण अपयशी ठरल्याचे दिसत आहेत. याचे फार मोठे आर्थिक सामाजिक व राजकीय परिणाम समोर येऊ लागले असून इम्रान खान यांच्या विरोधात असंतोष वाढू लागला आहे. ज्या पाकिस्तानच्या लष्कराने इम्रान खान यांना सत्तेवर आणले, असा दावा केला जातो, ते पाकिस्तानचे लष्करच आता इम्रान खान यांच्यावर संतापलेल्याच्या बातम्या येत आहेत.
इम्रान खान यांना राज्यकारभाराचा अनुभव नाही. त्याचवेळी निर्णय घेताना तज्ञांचे ऐकण्याचे शहाणपण देखील इम्रान खान दाखवित नाहीत. उलट आपल्या हेकेखोरपणामुळे चुकीची धोरणेही रेटून पुढे नेण्याचा त्यांचा स्वभाव सारे पाकिस्तानला खड्ड्यात घालत असल्याचा ठपका विरोधी पक्षनेते ठेवत आहेत. काही पत्रकारांनी तर पाकिस्तानचे लष्कर इम्रान खान यांची उचलबांगडी करणार असून नव्या नेत्याच्या नियुक्तीची तयारी करीत असल्याच्या बातम्या दिल्या आहेत. कोरोनाव्हायरस साथीचा उद्रेक झाला की इम्रान खान यांच्याविरोधातील जनभावनेचा वापर करून त्यांना सत्तेवरून खाली खेचले जाईल, अशी योजना तयार झाल्याचे दावे पत्रकारांनी केले आहेत.