डीएनएचा वापर करून घातक जैविक शस्त्रे विकसित होऊ शकतात

जैविक शस्त्रेवॉशिंग्टन – एखाद्या व्यक्तीचा ‘डीएनए’ मिळवून त्या माध्यमातून जैविक शस्त्र तयार करता येऊ शकते. याचा वापर करुन संबंधित व्यक्तीची हत्या घडविता येऊ शकते, असा इशारा अमेरिकेचे संसद सदस्य जेसन क्रो यांनी दिला. अमेरिकी सिनेटर जोनी अर्न्स्ट यांनी, ‘डीएनए बायो वेपन्स’चा वापर करून अन्नधान्याचा पुरवठा व अन्नसुरक्षेलाही लक्ष्य केले जाऊ शकते, असे बजावले आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेत पार पडलेल्या ‘ॲस्पन सिक्युरिटी फोरम’ या सुरक्षाविषयक परिषदेत जैविक शस्त्रांच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यात आले.

गेल्या काही वर्षात अमेरिकेत ‘डीएनए टेस्टिंग’ची लोकप्रियता वाढत असून युवा पिढीतील अनेक जण त्याचा वापर करीत असल्याचे समोर येत आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेक खाजगी कंपन्या अशा प्रकारच्या सेवा पुरवित आहेत, याकडे जेसन क्रो यांनी लक्ष वेधले. अमेरिकी जनतेने सर्रास याचा वापर करणे टाळावे व त्याबाबत निष्काळजीपणा दाखवू नये, असे क्रो यांनी बजावले. ‘एखाद्या व्यक्तीचा डीएनए घेऊन त्याची आरोग्यविषयक संपूर्ण माहिती मिळविली जाऊ शकते. त्यातून जैविक शस्त्र विकसित करून संबंधित व्यक्तीला मारता येईल किंवा त्याला पूर्ण निष्क्रीय करता येईल’, असा इशारा संसद सदस्यांनी यावेळी दिला.

जैविक शस्त्रेक्रो यांनी यावेळी ‘23 ॲण्ड मी’ या कंपनीचा उल्लेखही केला. माहिती मिळविण्यासाठी चाचणी केली व अशा कंपनीकडे पाठविली की संबंधित डीएनए त्या कंपनीच्या मालकीचा होतो. ही कंपनी ‘डीएनए’ व त्यातील माहिती कोणत्याही कायदेशीर सुरक्षेशिवाय कोणालाही विकू शकते, या धोक्याकडे क्रो यांनी लक्ष वेधले. संसद सदस्यांनी उल्लेख केलेल्या ‘23 ॲण्ड मी’ कंपनीने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. मात्र या कंपनीने पोलिसांसह सुरक्षायंत्रणांना आरोग्यविषयक माहिती पुरविल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत.

जैविक शस्त्रेक्रो यांच्यापाठोपाठ अमेरिकी सिनेटर जोनी अर्न्स्ट यांनीही ‘डीएनए बायोवेपन्स’च्या मुद्यावरून इशारा दिला. ‘अमेरिकेचे प्रतिस्पर्धी डीएनएतून तयार करण्यात आलेल्या जैविक शस्त्रांचा वापर करून अन्नपुरवठ्याला व्यापक प्रमाणात लक्ष्य करु शकतात. एखाद्या शहरात त्यातील नागरिकांकडून सर्वाधिक प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांवर जैविक शस्त्राचा उपयोग केला जाऊ शकतो’, असे अर्न्स्ट यांनी बजावले. केवळ माणसांनाच नाही तर अन्न देखील जैविक शस्त्रांच्या माध्यमातून बाधित केले जाऊ शकते, याबाबत गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे, असे सिनेटर अर्न्स्ट यांनी सांगितले.

गेल्या वर्षी अमेरिकी सिनेटर मार्को रुबिओ यांनी, रशियन व चिनी प्रयोगशाळा अमेरिकी नागरिकांच्या डीएनए चाचण्यांमध्ये सहभागी असल्याचा मुद्दा समोर आणला होता. अमेरिकी प्रशासनाच्या धोरणांमुळे अमेरिकी नागरिकांची जनुकीय माहिती चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीच्या हाती पडण्याची भीती आहे, असा इशाराही रुबिओ यांनी दिला होता.

leave a reply