गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूका घेऊन भारताला आव्हान देऊ नका

- पाकिस्तानच्या सरकारला देशी विश्लेषकांचा इशारा

ग्लास्गो – गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेऊन या भागाला पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून जाहीर करण्याच्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या या निर्णयाला पाकिस्तानातूनच विरोध होत आहे. तर खुद्द इम्रान खान यांच्या पक्षातूनच याविरोधात सूर लागू लागले आहेत. पंतप्रधान इम्रान चीनच्या दबावाखाली येऊन गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेत असल्याची टीका सुरू झाली आहे. तर पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानमधील नेत्यांनी सदर निवडणुकीविरोधात बंड पुकारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, गिलगिट बाल्टिस्तानसह पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानने ताबडतोब गिलगिट बाल्टिस्तान खाली करावे असे भारताने महिन्याभरापूर्वीच बजावले होते.

निवडणूका

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी १५ नोव्हेंबर रोजी गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेण्याचे जाहीर केले. यासाठी इम्रान यांच्या सरकारने २० उमेदवारांची यादी देखील घोषित केली. पण इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) या पक्षातूनच सदर निर्णयावर टीका होत आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संबंधित उमेदवारांची यादी इस्लामाबाद येथील चीनच्या दूतावासाकडे पाठवून मान्यता घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतापलेल्या ‘पीटीआय’च्या नेत्यांनी गिलगिट बाल्टिस्तानमध्ये बंड पुकारण्याची धमकी दिली असून घोषित उमेदवारांच्या विरोधातच निवडणूक लढविण्याचे स्पष्ट केले. तर स्थानिक नेते सज्जाद राजा, इब्राहम नागरी, मुहम्मद शरीफ खान यांनी सदर निवडणूक म्हणजे तमाशा असल्याचे सांगून इम्रान सरकारविरोधातच बंड झेंडा फडकाविला आहे. स्थानिकही या निवडणुकीकडे पाठ फिरवतील, असा दावा मुहम्मद शरीफ खान यांनी केला.

पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे लष्कर चीनच्या दबावाखाली येऊन गिलगिट बाल्टिस्तानमध्ये ही निवडणूक घेत असल्याचा आरोपही होऊ लागला आहे. भारताने वर्षभरापूर्वी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ आणि ‘कलम ३५अ’ काढून टाकल्यानंतर भारताच्या विरोधात विशेष काही करण्यात पाकिस्तानच्या सरकारला यश मिळाले नव्हते. हे दारूण अपयश टाळण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान गिलगिट बाल्टिस्ताबद्दल हा निर्णय घेत असल्याचा आरोप होत आहे. मात्र या निर्णयाचे फार मोठे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, अशी चिंता पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते करीत आहेत. तर पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाचा भारत अत्यंत वेगळ्यारितीने वापर करू शकेल आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरसह गिलगिट बाल्टिस्तान गमाविण्याची वेळ पाकिस्तानवर ओढावेल, असे काही विश्लेषक बजावत आहेत.

पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेतलीच तर त्याचे परिणाम सहन करावे लागतील, असा इशारा भारताने पाकिस्तानला याआधी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलगिट बाल्टिस्तान बाबत निर्णय घेण्याच्याआधी आवश्यक ती पूर्व तयारी केली आहे का, असा सवाल पाकिस्तानचे पत्रकार करीत आहेत. भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळेच जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतरही कुठलाही देश व आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताचा थेट विरोध पत्करण्याची धमक दाखविली नव्हती, याकडे पाकिस्तानी विश्लेषक लक्ष वेधत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानबाबतचा साहसवाद टाळावा, असे या पत्रकार व विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply