चीनवरील दडपण जराही कमी करू नका

- अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री कॉन्डोलिसा राईस

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसबाबत इशारे देणार्‍या आपल्या वैद्यक क्षेत्रातील मंडळीचे आवाज चीनने ज्याप्रकारे दडपले, तसा प्रकार हुकूमशाही असलेल्या देशात नेहमीच घडत असतो. याआधीच सार्सच्या बाबतीतही चीनने अशीच माहिती दडविली होती. तेव्हाच्या आणि आताच्या स्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे अमेरिका व आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनवरील दडपण जराही कमी न करता, या देशाला आपल्या जबाबदारीची जाणीव करून द्यायलाच हवी, असे उद्गार अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिसा राईस यांनी काढले आहेत.

चीन म्हणजे सर्वसाधारण देश ठरत नाही. त्यामुळे चीनमध्ये घडणाऱ्या उलथापालथीचा साऱ्या जगावर परिणाम होतो. चिनी कामगार जगभरात कार्यरत आहेत, चिनी प्रवासी जगभरात प्रवास करतात. इटलीमध्ये कित्येक चिनी कामगार कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत कोरोनाव्हायरसचा प्रसार इटलीत झाला का, हे स्पष्ट झालेले नाही. पण चीनला या आघाडीवर बेजबाबदारपणा दाखविता येणार नाही, हे मात्र यातून नक्कीच स्पष्ट झाले आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणे भाग पडते. यासाठी चीनवरील दडपण कायम ठेवण्याची गरज आहे, असे सांगून कॉन्डोलिसा राईस यांनी यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे.

कोरोनाव्हायरसची प्राथमिक माहिती बाहेर आल्यानंतर तिने याबाबत इशारा देणारे आपले फिजिशियन्स व वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षणार्थींचे आवाज बंद करून टाकले. चीनसारख्या हुकूमशाही व्यवस्था असलेल्या देशात असेच घडते. याआधीही सार्सची साथ आलेली असताना चीनने अशीच माहिती दडवून ठेवण्याची भूमिका स्वीकारली होती व त्यामुळे अमेरिकेच्या त्याकाळाच्या प्रशासनाला या साथीबद्दल अजिबात कळू शकले नव्हते. कोरोनाव्हायरस या साथीच्या बाबतीतही तसेच घडले आहे. असे सांगून अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिसा राईस यांनी चीनच्या इतिहासाचीही आठवण करून दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला धारेवर धरण्यास सुरुवात केली असून कोरोनाव्हायरसचा फैलाव करण्यामागे चीनचा कट आहे का, याची चौकशी अमेरिका करीत असल्याचे जाहीर केले आहे. माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिसा राईस यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या आरोपांना थेट पाठिंबा दिला नसला तरी चीन कोरोनाव्हायरस या साथीबाबत सत्य सांगायला तयार नाही, ही बाब आपल्या कुशल भाषेत मांडली आहे. त्यामुळे अमेरिकेतील ज्येष्ठ मुत्सद्दी देखील चीनला वेगवेगळ्या मार्गाने परखड संदेश देत असल्याचे दिसू लागले आहे.

कोरोनाव्हायरस या साथीचा प्रत्येक देश आपापल्या पद्धतीने सामना करीत असून यामुळे देशांच्या सीमा एकमेकांसाठी बंद झाल्या आहेत. युरोपीय देश आपल्या सीमा पूर्णपणे खुल्या करण्याच्या दिशेने प्रयत्न करीत होते. पण आता पुन्हा युरोपीय देशांच्या सीमा बंद झाल्या आहेत कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे ही प्रक्रिया उलटी झाली ही बाब राईस यांनी लक्षात आणून दिली आहे.

leave a reply