पाकिस्तानच्या सहाय्याच्या मागणीकडे भीक म्हणून पाहू नका

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे आवाहन

इस्लामाबाद – महापूरामुळे पाकिस्तानात गेलेल्या बळींची संख्या 1700 वर गेली असून यामुळे पाकिस्तानचे सुमारे 30 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाची हानी घडविणाऱ्या श्रीमंत देशांसमोर भीकेचा कटोरा घेऊन उभे राहण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले. पाकिस्तानकडे जे काही आहे आणि ज्याची गरज आहे, यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. ही तफावत दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना, मदतीसाठी पाकिस्तान करीत असलेल्या विनंतीकडे भीक म्हणून पाहू नये. पाकिस्तानवर ही आपत्ती म्हणजे पर्यावरणीय संकट ठरते व पाकिस्तान पर्यावरणीय न्याय श्रीमंत देशाकडे मागत आहे, असे सांगून पंतप्रधान शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय मदत हा जणू पाकिस्तानचा अधिकारच ठरतो, असा दावा ठोकून दिला आहे.

sharifब्रिटनच्या एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हे सारे दावे केले. महापूराने आलेल्या संकटातून अजूनही पाकिस्तान सावरलेला नाही. अन्नधान्यापासून ते औषधोपचारांपर्यंत प्रत्येक गोष्टीची टंचाई व अभाव याने पाकिस्तानची जनता हैराण झालेली आहे. पूरग्रस्त जनतेचे शोषण होत असल्याच्या भयंकर व्यथा पाकिस्तानचेच पत्रकार जगासमोर मांडत आहेत. इतकेच नाही तर आत्तापर्यंत जगभरातून आलेले सहाय्य इथल्या गरजूंपर्यंत पोहोचलेच नाही, त्याचा अपहार झालेला आहे, अशी जळजळीत टीका या पत्रकारांकडून केली जात आहे. तसेच पाकिस्तानच्या भ्रष्ट व्यवस्थेवर विश्वास नसल्यानेच, गरजूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरून अपेक्षित सहाय्य मिळत नसल्याचा ठपका या पत्रकारांबरोबरच पाकिस्तानची माध्यमे देखील ठेवत आहेत.

अशा परिस्थितीत, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ अमेरिकेपासून ते रशियापर्यंत प्रत्येक देशाकडे भीक मागत असल्याची टीका पाकिस्तानात होत आहे. याला उत्तर देताना पंतप्रधान शरीफ यांनी ब्रिटनच्या वर्तमापत्राकडे आपली कैफियत मांडली. महापूरामुळे पाकिस्तानची जबर हानी झालेली आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने आलेल्या मुसळधार पावसाने आपल्या देशाची ही अवस्था केली, पण हे पर्यावरणाचे संकट पाकिस्तानमुळे आलेले नाही. पाकिस्तानकडून केले जाणारे कार्बनचे उत्सर्जन अवघे 0.8 टक्के इतकेच आहे. अशा परिस्थितीत कार्बनचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या श्रीमंत देशांनी पाकिस्तानला सहाय्य करणे, ही त्यांची जबाबदारी ठरते. म्हणूनच पाकिस्तान करीत असलेल्या सहाय्याच्या आवाहनाकडे भीक म्हणून पाहिले जाऊ नये, असे पंतप्रधान शरीफ म्हणाले.

ही मांडणी करीत असताना, कार्बनचे उत्सर्जन अत्यंत कमी प्रमाणात करून पाकिस्तान जगावर उपकार करीत असल्याचे चित्र पंतप्रधान शरीफ उभे करीत आहेत खरे. पण यातून पाकिस्तानचा मागासलेपणाच सिद्ध होत आहे. किंबहुना अधिकारवाणीने भीक मागण्याचे नवे तंत्र पाकिस्तान विकसित करीत असल्याचे दिसू लागले आहे. कारण अमेरिकेने पाकिस्तानला सहाय्याची घोषणा करीत असताना, तुमचा निकटतम मित्रदेश असलेल्या चीनकडूनही सहाय्य घ्या, असे पाकिस्तानला सुनावले होते. हिमालयाहून उंच आणि सागराहूनही खोल, अशी पाकिस्तान व चीनची मैत्री असल्याचे दावे पाकिस्तानकडून केले जातात. असे असताना भयंकर संकटात सापडलेल्या पाकिस्तानकडे चीनने पाठ फिरविली आहे. चीनकडून अपेक्षित मदत मिळत नाही, अशी खंत पाकिस्तानातून व्यक्त होत आहे. तर काही चीनधार्जिणे पाकिस्तानी विश्लेषक याला पाकिस्तानच्या सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे सांगून चीनला आरोपमुक्त करीत आहेत.

पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकाधार्जिणे धोरण स्वीकारल्याने चीन पाकिस्तानवर संतापला आहे. म्हणूनच चीनने या संकटाच्या काळात पाकिस्तानकडे पाठ फिरविल्याचा दावा या चीनसमर्थक पाकिस्तानी पत्रकारांकडून केला जातो. पाकिस्तानच्या सरकारने स्वीकारलेल्या या धोरणामुळेच चीनने सीपीईसी प्रकल्प गुंडाळ्याचा दावा देखील या विश्लेषकांनी केला आहे.

leave a reply