डबल म्युटेशननंतर कोरोनाच्या ‘ट्रिपल म्युटेशन’ने चिंता वाढविल्या

- महाराष्ट्रासह चार राज्यात कोरोनाचा ‘ट्रिपल म्युटेशन’ प्रकार आढळल्याचा दावा

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या आलेल्या दुसर्‍या लाटेची भयावहकता वाढण्यामागे ‘डबल म्यूटेशन’ कोरोना कारणीभूत असल्याचा वारंवार दावा केले जात असताना आता कोरोनाव्हायरसचा ‘ट्रिपल म्युटेशन’ प्रकारही आढळला आहे. या ‘ट्रिपल म्युटेशन’ कोरोनाने चिंता अधिकच वाढविल्या आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड, दिल्ली आणि पश्‍चिम बंगालमध्ये हा ‘ट्रिपल म्युटेशन’ कोरोनाव्हायरस सापडल्याचा दावा एका वृत्त अहवालात करण्यात आला असून या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढीमागे कोरोनाचे हे ‘ट्रिपल म्युटेशन’ कारणीभूत असू शकते अशी शक्यता व्यक्त केली जाते. मात्र यासंदर्भात अजून पुरेसे संशोधन झाले नसून केंद्र सरकारने राज्यांना कोरोना संक्रमितांचे नमुने जिनोम टेस्टिंगसाठी पाठविण्यास सांगितल्याचे म्हटले जाते.

कोणताही विषाणू ठराविक काळात आपल्यात जनुकीत संरचनेत बदल करून घेत असतो. यातून विषाणूचे नवे प्रकार अस्तित्वात येतात. कधी ते अधिक घातक, तर कधी सौम्य बनून समोर येतात. जगभरात कोरोना साथीच्या नव्या लाटांमध्ये असेच कोरोनाचे नवे प्रकार किंवा प्रतिरुप अर्थात व्हेरियंट जबाबदार ठरले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या नवी लाट आली आहे. मंगळवारपासून बुधवारच्या सकाळपर्यंत देशात २ हजार २३ जणांचा या साथीने बळी गेला. देशात प्रथमच एका दिवसात कोरोनाने दोन हजारपेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. तसेच एका दिवसात २ लाख ९५ हजार नवे रुग्ण आढळले. चोवीस तासात इतक्या मोठ्या प्रमाणावर आढळणार्‍या कोरोना रुग्णसंख्येने आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढविला आहे. देशात फेब्रुवारीपासून वाढलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये डबल म्युटंट कोरोना विषाणू कारणीभूत असल्याची आशंका वारंवार व्यक्त करण्यात आली होती.

गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रातून पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ६१ टक्के हे ‘डबल म्यूटेशन’ झालेल्या कोरोना विषाणूचे होते, हे उघड झाले होते. मात्र नमुने कमी असल्याने यामुळे या आधारावर कोणताही निष्कर्ष काढता येऊ शकणार नाही. म्हणून अधिक नमुने जिनोम विश्‍लेषणासाठी पाठवा, असे केंद्राने निर्देश दिले होते. डबल म्युटेशन कोरोना नव्या लाटेसाठी जबाबदार असल्याच्या वारंवार आशंका नोंदविण्यात येत असताना कोरोनाचा ‘ट्रिपल म्युटेशन’ प्रकारही आढळला आहे.

कोरोनाचा ‘ट्रिपल म्युटेशन’ म्हणजे कोरोनाच्या तीन निरनिराळ्या स्ट्रेनपासून बनलेला कोरोनाचा नवा प्रकार. हा ‘ट्रिपल म्युटेशन’ कोरोना विषाणू अतिशय घातक ठरू शकतो. याचे मोठे आव्हान ठरू शकते. येत्या काही दिवसात याचे दुष्परिणाम दिसू लागतील, अशी भिती व्यक्त केली जात आहे. हा ‘ट्रिपल म्युटेशन’ कोरोना शरीरातील श्‍वसन संस्थेवर मोठा परिणाम करणार असल्याची भितीही व्यक्त केली जात आहे. तसेच कोरोना लस या ‘ट्रिपल म्युटेशन’वर प्रभावी ठरेल का? हे सुद्धा अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.

कोरोनाचा ‘ट्रिपल म्युटेशन’ प्रकार आढळल्यावर केंद्र सरकारही चिंतीत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवा, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. यामुळे या ‘ट्रिपल म्युटेशन’शी संबंधीत कोरोना संक्रमाणाची खरी महिती मिळू शकेल व त्यायोगे पुढील हालचाली व उपाययोजना करता येतील.

दरम्यान, कोव्हॅक्सिन डबल म्युटेंट कोरोनावर प्रभावी असल्याचे ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) म्हटले आहे. यासंदर्भातील संशोधनात ही बाब समोर आली आहे. भारतात आढळलेल्या ‘डबल म्युटेंट’ कोरोना विषाणूबरोबर ब्रिटन आणि ब्राझिलमध्ये आढळलेल्या कोरोना स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन प्रभावी ठरत असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. कोव्हॅक्सिन भारत बायोटेक आणि ‘आयसीएमआर’ने मिळून विकसित केली आहे.

leave a reply