राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय

नवी दिल्ली – मतमोजणी सुरू असतानाच राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित झाला होता. त्यानंतर मुर्मू यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. आदीवासी समुदायातून आलेल्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुमू लवकरच पदभार स्वीकारतील. त्यांच्या निवडीचे देशभरातून स्वागत होत आहे. द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती ठरतील.

Modi-Draupadi-Murmu‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ अर्थात ‘एनडीए’ने राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केली होती. तर माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा हे ‘संयुक्त पुरोगामी आघाडीचे अर्थात ‘युपीए’चे उमेदवार हेोते. लोकसभा, राज्यसभा व देशभरातील विधानसभांच्या सदस्यांकडून बहुमताने राष्ट्रपतींची निवड केली जाते. 18 जुलै रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी बहुमत मिळविले आहे. मतमोजणी सुरू असतानाच द्रौपदी मुर्मू यांनी घेतलेल्या प्रचंड आघाडीमुळे त्यांचा विजय आधीच निश्चित झाला होता.

ओडिशातील संथाळ या आदिवासी समुदायातून आलेल्या द्रौपदी मुर्मू अत्यंत साधारण पार्श्वभूमी लाभलेल्या आहेत. खडतर परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. 1997 साली नगरसेवक पदापासून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती. 2000 ते 2004 या काळात त्यांनी ओडिशा सरकारच्या मंत्री म्हणून काम पाहिले होते. 2015 साली त्यांची झारखंडच्या राज्यपाल पदावर त्यांची निवड झाली होती. 2021 सालापर्यंत त्या झारखंडच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत मुर्मू यांनी केलेला प्रवास प्रेरणादायी ठरतो, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. त्यांची राष्ट्रपतीपदावर झालेली निवड म्हणजे देशाच्या लोकशाहीचा गौरव ठरतो, असे सांगून आदिवासी समुदायाला मिळालेल्या या प्रतिनिधित्त्वाचे राजकीय विश्लेषकांकडून स्वागत केले जात आहे.

leave a reply