देशाच्या सुरक्षेसमोर ड्रोन हल्ल्यांचे नवे आव्हान

- सामरिक विश्‍लेषकांचा इशारा

नवी दिल्ली – वायुसेनेच्या जम्मूमधील हवाई तळावरील स्फोटासाठी ड्रोनचा वापर म्हणजे देशाच्या सुरक्षेसमोर खडे ठाकलेले नवे आव्हान असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. याआधी काही दहशतवादी संघटनांनी घातपातासाठी ड्रोन्सचा वापर केल्याचे उघड झाले होते. कमी वजनाचे व कमी उंचीवरून उड्डाण करणारे ड्रोन रडार यंत्रणेमार्फत टिपता येऊ शकत नाही. याचा पुरेपूर लाभ दहशतवादी संघटना घेत आहेत. भारतानेही पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या अशा ड्रोन हल्ल्यांना तोंड देण्याची तयारी ठेवावी, असे सामरिक विश्‍लेषक बजावत आहेत.

देशाच्या सुरक्षेसमोर ड्रोन हल्ल्यांचे नवे आव्हान - सामरिक विश्‍लेषकांचा इशाराड्रोनद्वारे शस्त्रे व स्फोटकांची वाहतूक करणे तसेच घातपात घडवून आणणे कमी जोखमीचे ठरते. त्यामुळे पुढच्या काळात दहशतवादी संघटना याचा सर्वाधिक वापर करू शकतात. पाकिस्तानसारखा देश भारताच्या विरोधात हे ड्रोन तंत्रज्ञान वापरण्याची तयारी करीत असून त्याला चीनची साथ मिळत आहे, याकडे विश्‍लेषकांनी लक्ष वेधले. म्हणूनच यापासून देशाच्या सुरक्षेला गंभीर आव्हान मिळू शकते, असा दावा विश्‍लेषकांनी केला. जम्मूच्या हवाई तळावर झालेला हल्ला ही इशाराघंटा आहे. नजिकच्या काळात अशा हल्ल्यांची संख्या व तीव्रता वाढत जाईल, असा इशारा विश्‍लेषक देत आहेत.

ड्रोनद्वारे घडविण्यात आलेल्या घातपाताची जबाबदारी झटकणे अतिशय सोपे ठरते. ही बाब देखील पाकिस्तानला भारताच्या विरोधात ड्रोन युद्ध छेडण्यासाठी प्रेरित करीत आहे. सध्या दहशतवादी हल्ल्याचा आरोप न होऊ देता पाकिस्तानला भारतात घातपात घडवायचे आहे. ड्रोनद्वारे केले जाणारे हल्ले हा त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. म्हणूनच भारताने लवकरात लवकर ड्रोनभेदी तंत्रज्ञान मिळवणे व त्याचा वापर सुरू करणे अत्यावश्यक बनल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. यासाठी भारताने तयारी केली असून इस्रायल तसेच दक्षिण कोरिया या देशांबरोबर भारताची चर्चा सुरू असल्याचे दावे केले जातात. मात्र याचे अधिक तपशील उघड झालेले नाहीत.

leave a reply