बगदाद – रविवारी स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कधीमी यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केले. यावेळी झालेल्या स्फोटातून पंतप्रधान कधीमी थोडक्यात बचावले, पण त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात सहा जवान गंभीर जखमी झाले. या स्फोटानंतर इराकी पंतप्रधानांच्या घराजवळ गोळीबार झाल्याचाही दावा केला जातो. गेल्या महिन्यात पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल मान्य नसलेल्या इराकमधील इराणसंलग्न गटांनी हा हल्ला चढविल्याचा दावा केला जातो. अमेरिकेने पंतप्रधान कधीमी यांच्यावरील हल्ल्याची तीव्र शब्दात निर्भत्सना केली आहे.
इराकच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख व विद्यमान पंतप्रधान मुस्तफा अल-कधीमी यांच्या सरकारी निवासस्थानावर रविवारी सकाळी ड्रोन हल्ला झाला. राजधानी बगदादमधील अतिसंरक्षित क्षेत्र म्हणून ओळण्यात येणार्या ग्रीन झोन भागात हा स्फोट झाला. यानंतर पंतप्रधान कधीमी यांनी सोशल मीडियाद्वारे इराकी जनतेला संयम दाखविण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनी इराकचे भविष्य उभारले जाणार नसल्याची टीका कधीमी यांनी केली.
या ड्रोन हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण इराकमधील इराणसंलग्न हाश्द अल-शाबी या सशस्त्र संघटनेने हा हल्ला घडविल्याचा संशय व्यक्त केला जातो. गेल्या महिन्यात इराकमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत इराणसंलग्न गटांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे खवळलेले सदर गट इराक सरकारकडे फेरमतमोजणीची मागणी करीत आहेत. शुक्रवारी यासाठी राजधानी बगदादमध्ये हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन सरकारविरोधात निदर्शने केली होती. यावेळी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत एका निदर्शकाचा बळी गेला.
इराकमधील निवडणुकीत मुक्तदा अल-सद्र यांच्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली आहेत. इराकच्या राजकारणात अमेरिका तसेच इराणचा हस्तक्षेप नसावा, अशी स्पष्ट भूमिका अल-सद्र यांनी स्वीकारली आहे. इराकची जनता देखील अल-सद्र यांच्या या भूमिकेच्या पाठिशी असल्याचे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले. २०१९ साली इराणसंलग्न गटांनी इराकी निदर्शकांवर केलेल्या कारवाईत ६०० हून अधिक जणांचा बळी गेला होता. त्यामुळे इराकी जनतेमध्ये इराण व इराणसंलग्न गटांबाबत संताप वाढला होता. गेल्या महिन्यातील निवडणूकीत हाच रोष उफाळून समोर आल्याचे आखाती विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पंतप्रधान कधीमी यांच्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. तर सौदी अरेबिया आणि युएईने देखील इराकी पंतप्रधानांवर झालेल्या ड्रोन हल्ल्याची कठोर शब्दात निर्भत्सना केली. या कठीण काळात सौदी इराकच्या पंतप्रधानांबरोबर असल्याचे सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तर इराकमधील सुरक्षा आणि स्थैर्याला धक्का पोहोचविण्यासाठी केलेल्या या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, अशी टीका युएईने केली. तर या हल्ल्याद्वारे इराकमधील सशस्त्र गट देशात मोठे बंड उभारण्याच्या तयारीत असल्याचा इशारा विश्लेषकांनी दिला.