जिनपिंग यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुपस्थितीमुळे चीन पुन्हा कोशात जात असल्याचे संकेत

- विश्‍लेषक व माध्यमांचा दावा

जिनपिंगबीजिंग – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या ६५० दिवसांहून अधिक दिवस एकही परदेश दौरा केला नसून कोणत्याही जागतिक नेत्याची भेट घेतलेली नाही. गेल्या काही महिन्यात जगातील आघाडीचे नेते विविध कार्यक्रम व बैठकांच्या माध्यमातून परस्परांची वैयक्तिक पातळीवर भेट घेत आहेत. मात्र त्यात शी जिनपिंग यांचा समावेश नाही. ही बाब जिनपिंग यांच्याबाबतचे गूढ वाढविणारी असून चीन पुन्हा कोशात जात असल्याचे संकेत देणारी असल्याचा दावा ‘द सिंगापूर पोस्ट’ने केला आहे. ब्रिटनच्या ‘फायनान्शिअल टाईम्स’ या दैनिकानेही याला दुजोरा देणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोना साथीची तीव्रता काही अंशी कमी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर, अनेक आघाडीच्या जागतिक नेत्यांनी परराष्ट्र दौरे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. नाटोची बैठक, जी२० परिषद, ‘सीओपी-२६ समिट’ या माध्यमातून अनेक नेत्यांनी परस्परांची वैयक्तिक स्तरावर भेट घेऊन चर्चा केली. कोरोनाच्या काळात काही अंशी थंडावलेल्या राजनैतिक घडामोडींना अधिक वेग आला आहे.

मात्र या सर्व कालावधीत राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठेही चीनचे नेतृत्त्व करताना दिसून आलेले नाहीत. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या काही वर्षात सातत्याने परदेश दौरे करणारे व जागतिक नेत्यांच्या भेटी घेणारे जिनपिंग या दोन्ही गोष्टी टाळताना दिसत आहेत. यासाठी चीनच्या राजवटीकडून कोरोना व त्यासंदर्भातील नियमांचे कारण पुढे करण्यात येत असल्याचा दावा, ‘द सिंगापूर पोस्ट’च्या लेखात करण्यात आला आहे.

जिनपिंग यांच्या या अनुपस्थितीची दखल घेऊन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी त्यांना टोलाही लगावला होता. ‘सीओपी-२६ समिट’मध्ये बोलताना, आम्ही सर्व इथे आहोत आणि ते आलेले नाहीत, असे उद्गार राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी काढले होते. असे करून तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्त्वाचे दावे कसे करु शकता, असा सवालही बायडेन यांनी केला होता. जिनपिंग यांच्या अनुपस्थितीचा फायदा उचलून अमेरिका चीनविरोधातील आघाडी मजबूत करीत असल्याचे दावेही विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

जिनपिंगचीनच्या राष्ट्राध्यक्षांची अनुपस्थिती देशातील अंतर्गत आव्हाने जिनपिंग यांच्यासाठी जास्त महत्त्वाची असल्याचे संकेत देणारी आहेत, असे ‘द सिंगापूर पोस्ट’ने म्हटले आहे. जिनपिंग यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गैरहजेरीची चार कारणे असण्याची शक्यताही लेखात वर्तविण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रावर सुरू असलेली कारवाई, अर्थव्यवस्थेला बसणारे धक्के व त्यामुळे होणारी वाढती टीका, आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची डागाळलेली प्रतिमा आणि २०२२मध्ये होणारे कम्युनिस्ट पार्टीचे अधिवेशन ही ती कारणे असू शकतात, असा दावा ‘द सिंगापूर पोस्ट’ने केला.

ब्रिटनच्या ‘फायनान्शिअल टाईम्स’ने आपल्या लेखात अंतर्गत पातळीवर असलेले दडपण व परदेशात तीव्र होत असलेले टीकेचे सूर यामुळे चीनने पुन्हा कोशात जाण्यास सुरुवात केल्याचे म्हटले आहे. ‘परदेशी विचारसरणी, संकल्पना यांच्यापासून चीनला दूर ठेऊन बाह्य जगाशी असलेले संबंध कमी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कोरोनाची साथ यासाठी सहाय्यक ठरली आहे. यामागील अंतिम उद्दिष्ट एकाधिकारशाही मजबूत करणे व कम्युनिस्ट पार्टीची राजवट दीर्घकाळ टिकेल, याची खात्री करून घेणे हा असावा’, अशी शक्यता प्राध्यापक जीन-पिएरे कॅबेस्टन यांनी वर्तविली. चीनमध्ये वास्तव्य करणार्‍या परदेशी नागरिकांची संख्या कमी होत असल्याचा दावाही लेखात करण्यात आला आहे.

यापूर्वी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबतही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.

leave a reply