देशातील किरकोळ व्यापाऱ्यांसाठी ई-कॉमर्स पोर्टल

नवी दिल्ली – देशातील व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) किरकोळ व्यापाऱ्यांसाठी तंत्रज्ञानावर आधारित “भारतईमार्केट ‘ हे ई-कॉमर्स पोर्टल सुरु करण्यात आले आहे. देशात वाढत असलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांमुळे देशातील व्यापार क्षेत्राला समोर मोठे आव्हान उभे राहिले असून त्याचा फटका भारतीय व्यापार क्षेत्राला बसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ई-कॉमर्स कंपन्या देशात मोठ्या प्रमाणात विस्तारत आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या या क्षेत्रात असून त्यांची प्रचंड गुंतवणूक आणि या कंपन्यांच्या ऑनलाईन सेलमुळे स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्याशी स्पर्धा करणे अवघड जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘कॅट’ने किरकोळ व्यापाऱ्यांसाठी ई -कॉमर्स पोर्टल उपलब्ध केले आहे. त्यामुळे किरकोळ व्यापारी देखील आपल्या मालाची ऑनलाईन विक्री करू शकतील. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) साहाय्याने हे पोर्टल उपलब्ध करण्यात आले आहे. या पोर्टलमुळे देशभरातील सात कोटी व्यापारी जोडले जातील. या ईकॉमर्स मार्केटप्लेसमध्ये कॅट विविध तंत्रज्ञान कंपन्यांची क्षमता एकत्र आणणार असून त्यामुळे ग्राहकांना त्याच्या घरापर्यंत सामान उपलब्ध करून देता येईल. देशभरातील ९५ टक्के व्यापाऱ्यांना एकाच छत्राखाली आणण्याचे प्रयत्न पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

प्रत्यक्ष व्यापार करणारे व्यापारी, उद्योजक हेच या ई-प्लॅटफॉर्मवर सुद्धा सहभागी असतील. यामध्ये लहान-मोठे उत्पादक व सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना सामावून घेतले जाणार जाईल. मुख म्हणजे या तंत्रज्ञानाची मालकी सुद्धा शेअर होल्डर पद्धतीने भारतीय व्यापारी, उद्योजकांची असेल . छोट्यातले छोटे व्यापारी सुद्धा या नवीन कंपनीचे समभाग खरेदी करून याच्या मालकीमध्ये सहभागी होऊ शकेतील, असे सांगण्यात आले. ”ऑनलाइन व्यापाराचा स्थानिक व्यापारांना मोठा फटका बसत होता. मात्र या पोर्टलमुळे ऑनलाइन व्यापार करणाऱ्या जगातील बलाढ्य कंपन्यांना भारतीय व्यापाऱ्यांनी दिलेले हे एक मोठे आव्हान ठरेल. जगात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून, भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने या संकल्पनेला भक्कम पाठबळ दिले आहे. तसेच भारत सरकार लवकरच ई-कॉमर्स व्यवसायासाठीची नवीन धोरण जाहीर करणार असून, या धोरणामुळे भारतीय व्यापाऱ्यांच्या मालकीच्या पोर्टल अधिक बळ मिळेल”, असा विश्वास ‘कॅट’ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ललित गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रायोगिक तत्वावर प्रयागराज, गोरखपूर, वाराणसी, लखनऊ, कानपूर आणि बेंगळुरु या सहा प्रमुख शहरांमध्ये हे पोर्टल सुरु करण्यात आले होते. याला किरकोळ विक्रेते, ग्राहक व वितरकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शहरांची संख्या वाढवत आता ९० शहरापर्यंत ही सेवा सुरू करण्यात आली असल्याचे ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया व राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल म्हणाले. हे पोर्टल व्यापारांनी व्यापाऱ्यांसाठी सुरू केलेले पोर्टल आहे. पोर्टलच्या माध्यमातून ग्राहकांना घरपोच सामान पोहचवण्यात येणार असून ग्राहकांना व्यवहार शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे यावेली स्पष्ट करण्यात आले. येत्या डिसेंबरपर्यंत देशातील किमान ५० लाख व्यापारी या प्लॅटफॉर्मवर जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यानंतर लवकरच या पोर्टलद्वारे १ कोटी व्यापाऱ्यांना जोडण्यात येईल.

leave a reply