तुर्की व सिरियाला भूकंपाने हादरविले

- बळींची संख्या 2300च्या पुढे - हजारो इमारती जमीनदोस्त - बचावकार्यासाठी जगभरातून पथके रवाना

अंकारा – तुर्की आणि सिरिया या देशांमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये 2300 जणांचा बळी गेला आहे. या भूकंपामध्ये दोन्ही देशांमध्ये अक्षरशः हजारो इमारती कोसळल्या आहेत. हजारो जण या कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले असून दर तासागणिक बळींच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. या भयंकर आपत्तीनंतर सर्वच देशांनी तुर्की व सिरियाला सहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला भारताने देखील आपल्या आपत्तीनिवारक दलाची व वैद्यकीय दलाची पथके तुर्की व सिरियाला रवाना केली आहेत.

सोमवारी पहाटेच्या सुमारास तुर्कीच्या कहरामनामरास येथे 7.8 रिश्टर स्केल इतका भीषण भूकंप झाला. गाढ झोपेत असल्याने या भूकंपाच्या धक्क्यातून स्वतःला वाचवण्याची संधी कित्येक जणांना मिळाली नाही. या भूकंपात एकाच वेळी अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आणि गदारोळ माजला. याला काही तास उलटत नाही तोच, कहरामनामरास प्रांतापासून 100 किलोमीटर अंतरावर 7.5 रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला. हा आधी झालेल्या भूकंपाच्या हादऱ्यांचा भाग नव्हता, तर नवा भूकंप होता, अशी माहिती दिली जाते. यामध्ये झालेली वाताहत अजूनही पूर्णपणे समोर आलेली नाही.

कहरामनामरासमध्ये झालेल्या भूकंपाचे हादरे इजिप्तपासून सौदी अरेबियापर्यंत जाणवले. त्यातून या भूकंपाच्या तीव्रतेची जाणीव होत आहे. तुर्कीच्या दहा प्रातांमध्ये भूकंपाच्या हादरामुळे 1500 हून अधिकजणांचा बळी गेल्याची माहिती दिली जाते. तर सिरियाच्या अलेप्पा व हमा या दोन प्रांतातील हजारो इमारती या भूपंकामुळे कोसळल्याचे सांगितले जाते. सिरियामध्ये सध्या भीषण गृहयुद्ध सुरू आहे व या युद्धात झालेल्या हानीपेक्षाही भयंकर हानी या भूकंपाने घडविल्याची माहिती सिरियातील रुग्णालयांनी दिली. आधीपासूनच संघर्षात पोळले जात असलेल्या सिरियासाठी भूकंपाची ही आपत्ती अधिकच भीषण बनली आहे.

तुर्की व सिरियातील या भूकंपाचे विदारक परिणाम समोर येत असताना, इतिहासात या देशांना बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची माहिती माध्यमांकडून दिला जाते. हे दोन्ही देश भूकंपप्रवण क्षेत्रात असून इथे वारंवार धरणीकंप होत असतो. तरीही सोमवारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता भयंकर होती आणि तब्बल 84 वर्षात तुर्कीमध्ये झालेले हे सर्वात भीषण भूकंप ठरले. 1939 साली या क्षेत्रात झालेल्या भूकंपात सुमारे 33 हजारजणांचा बळी गेला होता. तर 1999 साली तुर्कीच्या व्यायव्येकडील प्रांतात झालेल्या भूकंपात जवळपास 18 हजार जणांचा बळी गेला होता. त्यानंतर तुर्कीला बसलेला भूकंपाचा हा सर्वात मोठा धक्का ठरतो. याचे भीषण परिणाम तुर्कीला सहन करावे लागणार आहेत.

या भूकंपानंतर युरोपिय देशांनी तुर्कीला सहाय्य करण्यासाठी पथके पाठविली. ही पथके तुर्कीला पोहोचल्याची माहिती दिली जाते. आखाती देशांनीही तुर्कीला सहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतल्याच्या बातम्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूकंपात झालेल्या हानीवर तीव्र दुःख व्यक्त केले. या आपत्तीमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करून यात जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या भीषण आपत्तीत भारत तुर्कीच्या जनतेसोबत आहे व तुर्कीला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी भारत सर्वतोपरी सहाय्य करील, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे.

leave a reply