इजिप्त रशियाला ४० हजार रॉकेट्स पुरविण्याच्या तयारीत

अमेरिकेच्या ‘पेंटॅगॉन लीक’मधील आरोप

वॉशिंग्टन/कैरो – आखातातील अमेरिकेचा निकटतम सहकारी देश असलेल्या इजिप्तने बायडेन प्रशासनाला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. युक्रेनमधील युद्धासाठी इजिप्त रशियाला लवकरच ४० हजार रॉकेट्सचा पुरवठा करू शकतो. फेब्रुवारी महिन्यातच राष्ट्राध्यक्ष फताह अल-सिसी यांनी यासंबंधीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इजिप्तमध्ये रॉकेट्स निर्मितीने वेग धरला होता, असा आरोप अमेरिकेच्या नव्या ‘पेंटॅगॉन लीक’मधील पेपर्समध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाने या लीकबाबत चौकशी सुरू केली आहे. तर इजिप्तने आपल्यावरील हे आरोप फेटाळले आहेत.

RUSSIA-EGYPT-POLITICSगेल्या वर्षभरापासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध या वर्षअखेरीपर्यंत खेचले जाईल, असा दावा केला जातो. या संघर्षात दोन्ही देशांना शस्त्रास्त्रांचा तुटवडा पडत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. अमेरिका व युरोपिय तसेच मित्रदेश युक्रेनला आवश्यक ते लष्करी सहाय्य पुरवित आहेत. युक्रेनच्या मागणीनुसार लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, हवाई सुरक्षा यंत्रणा युक्रेनमध्ये किंवा सीमेजवळ तैनात केल्या जात आहेत. त्याचबरोबर अमेरिकेकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्याची घोषणा केली जाते.

तर पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांचे लक्ष्य ठरलेल्या रशियाला इराणकडून ड्रोन्सचा पुरवठा सुरू असल्याचा आरोप युक्रेन तसेच अमेरिकेने केला होता. इराणने आपल्यावरील हे आरोप धुडकावले होते. पण आत्ता पेंटॅगॉनमधून गहाळ झालेल्या नव्या माहितीनुसार, अमेरिकेचा आखातातील मित्रदेश असलेला इजिप्तच रशियाला ४० हजार रॉकेट्स पुरविणार आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सिसी यांनी हे सहकार्य गोपनीय राखण्याची ताकीद आपल्या अधिकाऱ्यांना दिली होती, असे या लीक्समध्ये म्हटले आहे. हे आरोप गंभीर असतील तर इजिप्तबरोबरच्या संबंधांवर फेरविचार करावा लागेल, असा इशारा अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर ख्रिस मर्फी यांनी दिला.

पण इजिप्तने आपल्यावरील हे आरोप फेटाळले आहेत. तसेच रशिया-युक्रेन युद्धाप्रकरणी आपल्या भूमिकेत आजही बदल झालेला नाही, असे इजिप्तने म्हटले आहे. या संघर्षाप्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पार पडलेल्या मतदानात आपल्या देशाने तटस्थ तसेच हा संघर्ष थांबविण्याची भूमिका स्वीकारली होती, याकडे इजिप्तचे अधिकारी लक्ष वेधत आहेत.

leave a reply