इजिप्तने दक्षिण कोरियाशी के९ तोफांच्या खरेदीचा करार केला

कैरो – इजिप्तने मिनिटांमध्ये सहा ते आठ गोळे डागण्याची क्षमता असलेल्या के९ या तोफांची खरेदी केली आहे. दक्षिण कोरियाच्या या प्रगत तोफांसाठी इजिप्तने तब्बल १.७ अब्ज डॉलर्सचा खरेदी व्यवहार केला आहे. इजिप्तने दक्षिण कोरियाकडून के९ तोफांची नौदल आवृत्ती खरेदी केल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने संरक्षण सहकार्यावर बंदी टाकल्यानंतर इजिप्तने वेगवेगळ्या देशांबरोबर संरक्षण सहकार्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

इजिप्तने दक्षिण कोरियाशी के९ तोफांच्या खरेदीचा करार केलाइजिप्तच्या मिनिस्ट्री ऑफ मिलिटरी प्रोडक्शन आणि दक्षिण कोरियाच्या हॅन्वा डिफेन्स या दोन कंपन्यांमध्ये हा करार पार पडला आहे. दक्षिण कोरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, १.६५ अब्ज डॉलर्सचा हा करार असून याअंतर्गत दक्षिण कोरिया इजिप्तला पहिल्या टप्प्यात के९ तोफा पुरविणार आहे. त्याचबरोबर इजिप्तमध्ये दक्षिण कोरियन कंपनी या तोफांचे स्वतंत्र निर्मिती प्रकल्पही उभारणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कैरोमध्ये आयोजित केलेल्या इंटरनॅशनल डिफेन्स अँड मिलिटरी इंडस्ट्रीज एक्स्पोमध्ये या तोफांची इजिप्शियन आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली होती.

४० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची आणि ६७ किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करण्याची के९ तोफांची क्षमता आहे. ही तोफ एका मिनिटांमध्ये सहा ते आठ गोळे डागू शकते. या तोफेचा बंब ३६० अंश कोनात फिरू शकतो. इजिप्त किंवा दक्षिण कोरियाने किती तोफांचा खरेदी व्यवहार झाला, याचे तपशील जाहीर केलेले नाहीत. पण लष्करी विश्लेषकांच्या मते इजिप्तने दक्षिण कोरिया कडून दोनशे तोफांच्या खरेदीचा व्यवहार केल्याची दाट शक्यता आहे.

तब्बल दशकभरानंतर इजिप्तच्या लष्कराची तोफांची मागणी यामुळे पूर्ण होणार असल्याचा दावा केला जातो. २०१०-११ दरम्यान इजिप्तमध्ये पेटलेले अरब स्प्रिंग आणि त्यानंतर इजिप्तमध्ये झालेला सत्तापालट व निर्माण झालेले राजकीय अस्थैर्य, यामुळे तोफांच्या खरेदी कडे दुर्लक्ष झाले होते. मात्र गेल्या वर्षी सीसी सरकारने या तोफांच्या खरेदीसंबंधी वेगाने पावले उचलली आहेत. दक्षिण कोरियाकडून के९ तोफा खरेदी करणारा इजिप्त हा पहिला आफ्रिकी देश ठरतो.

याआधी भारत, तुर्की, पोलंड, नॉर्वे, फिनलंड, इस्टोनिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी दक्षिण कोरियाकडून के९ तोफांची खरेदी केली होती. भारताने दक्षिण कोरिया कडून खरेदी केलेल्या के९ वज्र तोफांची तैनाती लडाखच्या एलएसी जवळ केली आहे. तीन महिन्यांपूर्वी भारतीय लष्कराने एलएसीजवळ या तोफांचा मोठा सरावही केला होता. त्यानंतर इजिप्तने दक्षिण कोरिया बरोबर के९ खरेदी संबंधित चर्चा सुरू केल्याचे दावे केले जातात. याआधी भारताने फ्रान्सकडून राफेल विमानांची खरेदी केल्यानंतर इजिप्तने राफेलच्या खरेदी संबंधित व्यवहार केले होते.

leave a reply