अणुकरारावरील चर्चा पुढे रेटण्यासाठी अमेरिकेने इराणवरील काही निर्बंध मागे घेतले

काही निर्बंध मागेवॉशिंग्टन/तेहरान – अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने इराणच्या अणुकार्यक्रमावरील काही निर्बंध मागे घेतले आहेत. व्हिएन्ना येथे रखडलेली इराणबरोबरील अणुकराराबाबतची चर्चा पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बायडेन प्रशासनाने म्हटले आहे. पण बायडेन प्रशासन तसेच सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातील सिनेटर्सच यावर प्रश्न उपस्थित करीत आहेत.

शुक्रवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावर लादलेले निर्बंध मागे घेण्याच्या दस्तावेजांवर स्वाक्षरी केली. अमेरिकेचे शिष्टमंडळ तातडीने व्हिएन्नासाठी रवाना झाले आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला इराणबरोबरचा अणुकरार मार्गी लागेल, अशी बायडेन प्रशासनची अपेक्षा आहे.

हा अणुकरार संपन्न झाल्यास इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखता येईल, असा दावा बायडेन प्रशासन करत आहे. पण बायडेन यांच्या प्रशासनातील काही अधिकारी तसेच सत्ताधारी डेमोक्रॅटस पक्षातील काही वरिष्ठ सिनेटर इराणवरील निर्बंध मागे घेण्याच्या आणि व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटींच्या विरोधात आहेत.

अमेरिका आणि युरोपीय देशांबरोबरील वाटाघाटींमध्ये सहभागी झालेला इराण वर्षभरात अणुबॉम्बची निर्मिती करील, असा इशारा इस्रायली यंत्रणांनी याआधी दिला होता. अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारीही बायडेन प्रशासनाने इराणबाबत स्वीकारलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करीत आहेत. बायडेन यांच्याच डेमोक्रॅटस पक्षाचे वरिष्ठ सिनेटर रॉबर्ट मेनेंडेस यांनी इराणबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींवर प्रश्न उपस्थित केला.

‘याक्षणी आपण नेमके काय वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत, हा प्रश्न विचारायला हवा’, असे मेनेंडेस म्हणाले. ‘या अणुकरारासाठी आपण कोणत्या कठोर मागण्या केल्या आहेत, हे मला जाणून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात आणि क्षेत्रातील काही निर्बंध मागेदहशतवादी संघटनांना देण्यात येणार्‍या समर्थनापासून मागे येणार नसल्याचे इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी ठणकावून सांगितले आहे. असे असतानाही इराणबरोबर विधायक अणुकरार कसा होऊ शकतो?’, असा जाब सिनेटर मेनेंडेस यांनी बायडेन प्रशासनाला विचारला आहे.

गेल्या वर्षभरात आण्विक वाटाघाटींच्या पडद्याआड इराणने आपला अणुकार्यक्रमाचा वेग वाढविला आहे. असे असतानाही बायडेन प्रशासन २०१५ सालचा ओबामा प्रशासनात काळातील अणुकरार पुनर्जीवित करून इराणला मोकळीक देत असल्याची टीका अमेरिकेत होऊ लागली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध लादून इराणवर दबाव निर्माण केला होता. बायडेन प्रशासनाचे निर्णय इराणला अणुकार्यक्रम सुरू करण्यासाठी सहाय्यक ठरत असल्याची टीका अमेरिकी माध्यमांमधून होत आहे. मात्र इराणबरोबर अणुकरारासाठी धडपड सुरू असताना, सौदी, युएई व जॉर्डन या देशांना शस्त्रसहाय्य करून बायडेन प्रशासन आपले आखाती देशांबाबतचे धोरण संतुलित असल्याचा आभास निर्माण करू पाहत आहे.

leave a reply