उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी संघटनांच्या आठ हस्तकांची धरपकड

लखनऊ/हरिद्वार – उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) वेगवेगळ्या भागात केलेल्या कारवाईत अल कायदा व अल कायदाशी संलग्न असलेल्या जमात-उल-मुजाहिद्दिनशी (जेएमबी) निगडित असलेल्या आठ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांचा या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच पैशांच्या हस्तांतरणाचेही धागेदोरे आणि प्रक्षोभक साहित्य सापडल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या एटीएसने दिली.

outfits arrested in Uttar Pradeshउत्तर प्रदेशच्या दहशतवादी पथकाने उत्तर प्रदेशसह उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या भागात कारवाई करून आठ संशयितांना अटक केली. ताब्यात घेण्यात आलेल्या या आठजणांमध्ये लुकम, कारी मुख्तार, कामिल आणि मोहम्मद अलीम यांचा समावेश असून ते सहारनपूरचे रहिवासी आहेत. नवाजीश अन्सारी झारखंड, मुदस्सीर उत्तराखंडमधील हरिद्वारचे रहिवासी असून तर शहजाद शामली, अली नूर बांगलादेशचा नागरिक आहे, अशी माहिती एटीएसने दिली.

दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविण्यात हे गुंतलेले असल्याचे असल्याचे ठोस इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळाले आहेत. तसेच त्यांच्याकडून प्रक्षोभक साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. तसेच गजवा-ए-हिंद (जीईए) या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करण्याचे काम देखील ताब्यात घेतलेल्यांपैकी काहीजणांकडून केले जात होते. भारतात दहशतवाद्यांचे जाळे उभे करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती व यासाठी ते दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे.

एटीएसने केलेल्या कारवाईत मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्डस्‌‍ ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 2.5 लाख रुपयांची रोकड देखील जप्त करण्यात आली आहे. हा पैसा दहशतवादी कारवायांसाठी बांगलादेशमधील दहशतवादी अब्दुल्ला तल्हा याने पाठविल्याचे सांगितले जाते.

उत्तर प्रदेश पोलिसांनी गेल्या आठवड्यात हरिद्वारमधील दादूपूर गोविंदपूर गावातून एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तराखंडमधून आणखी एका दहशतवाद्याची धरपकड करण्यात आली. तसेच मार्च महिन्यात भोपाळमधून अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी दहशतवाद्यांच्या चौकशीत महत्त्वाची माहिती हाती लागली होती. या माहितीच्या आधारे सहारनपूर येथून 26 सप्टेंबर रोजी लूकमानला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशी आणखी काही महत्त्वाची नावे समोर आली.

त्यानंतर ही कारवाई करून आणखी सातजणांना पकडण्यात आले आहे. लुकमानच्या चौकशीदरम्यान तो बांगलादेशी दहशतवादी अहसान आणि मुफ्कीर यांच्या संपर्कात आल्याचे समोर आले. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये दहशतवाद्यांची पाळेमुळे रुजविण्याचे कटकारस्थान आखण्यात आल्याची माहिती यामुळे उघड झाली आहे.

leave a reply