इथिओपियाच्या ओरोमिया प्रांतात वांशिक हत्याकांड

- दोन आठवड्यात दोनशेहून अधिकजणांचा बळी

वांशिक हत्याकांडआदिस अबाबा – इथिओपियाच्या ओरोमिआ प्रांतात झालेल्या वांशिक संघर्षात 200हून अधिक जणांचा बळी गेला आहे. गेल्या आठवड्यात ओरोमिया प्रांतातील ‘ईस्ट वोलेगा झोन’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या भागातील संघर्षात हे बळी गेले. इथिओपिया सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या ‘ओरोमो लिबरेशन आर्मी’ या गटाने हे हत्याकांड घडविल्याचे सांगण्यात येते. या गटाने तिगरेतील सशस्त्र बंडखोर गटांबरोबर पंतप्रधान अबि अहमद यांचे सरकार उलथण्यासाठी हातमिळवणी केल्याचेही समोर आले आहे.

इथिओपियाच्या मानवाधिकार आयोगाने दिलेल्या माहितीतून वांशिक हत्याकांडाची घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यात 18 ऑगस्टला, ‘ओरोमो लिबरेशन आर्मी’ने ‘ईस्ट वोलेगा झोन’मधील किरामु डिस्ट्रिक्टमध्ये भीषण हल्ला चढविला. या हल्ल्यात अम्हारावंशियांना लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यात150हून अधिक जणांचा बळी गेला असून त्यात महिला व लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या हल्ल्यानंतर सूड म्हणून स्थानिक बंडखोर गटांनी वांशिक हत्याकांडप्रतिहल्ले चढविल्याचे समोर आले असून त्यात 60हून अधिक जणांचा बळी गेला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तात बळींची संख्या 230हून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. वांशिक संघर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची सहा महिन्यांमधील ही दुसरी वेळ आहे. मार्च महिन्यात ओरोमो व अम्हारावंशियांमध्ये झालेल्या भीषण वांशिक संघर्षात 300हून अधिक जणांचा बळी गेला होता. तीन वर्षांपूर्वी इथिओपियाची सूत्रे स्वीकारलेल्या अबि अहमद यांनी वांशिक संघर्षावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात इथिओपियात नव्याने वांशिक संघर्षाचा भडका उडत असल्याचे दिसू लागले आहे.

तिगरे प्रांतातील बंड मोडण्यात पंतप्रधान अबि अहमद अपयशी ठरले आहेत. उलट तिगरेतील बंडखोरांनी आता इतर भागांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. त्याचवेळी ओरोमो लिबरेशन आर्मी व तिगरेतील बंडखोर एकत्र आल्याचेही समोर आले आहे. ही एकजूट पंतप्रधान अहमद यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरेल, असे मानले जाते. देशांतर्गत बंड मोडण्यासाठ त्यांनी शेजारी देश इरिट्रिआची मदत घेतली असून ही बाब त्यांच्यावर उलटू शकते, असा इशारा विश्‍लेषकांकडून देण्यात येत आहे.

leave a reply