रशियन इंधनक्षेत्रावरील मतभेदांच्या पार्श्‍वभूमीवर युरोपिय महासंघाचा अमेरिकेबरोबर इंधन भागीदारी करार

ब्रुसेल्स/वॉशिंग्टन/मॉस्को – रशियाच्या इंधनक्षेत्रावर निर्बंध लादण्याच्या मुद्यावर युरोपिय महासंघात असलेले मतभेद अजूनही कायम असल्याचे उघड झाले आहे. गुुरुवारी बु्रसेल्समध्ये झालेल्या बैठकीतून ही बाब समोर आली. जर्मनी, नेदरलॅण्डस्, ऑस्ट्रिया यासारख्या देशांचा विरोध कायम असून नजिकच्या काळातही ही बाब अशक्य असल्याची हतबल प्रतिक्रिया युरोपिय नेत्यांनी दिली आहे. दरम्यान, रशियन इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी युरोपिय महासंघाने अमेरिकेबरोबर दीर्घकालिन भागीदारी करार केल्याचे जाहीर करण्यात आले.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला एक महिना पूर्ण होत असून या कालावधीत युरोपिय महासंघाने चार टप्प्यात रशियावर मोठे निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांअंतर्गत रशियातील ८७०हून अधिक नेते, अधिकारी व उद्योजकांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर ६२ रशियन कंपन्यांवर निर्बंध लादल्याची माहितीही महासंघाने दिली आहे. मात्र या कंपन्यांमध्ये रशियातील इंधनकंपन्यांचा समावेश नाही. रशियाने इंधनावरून केलेले ब्लॅकमेल खपवून घेणार नाही, असे इशारे देणारा युरोपिय महासंघ अजूनही रशियन इंधनाची आयात बंद करण्यात अपयशी ठरला आहे.

या इंधनात केवळ नैसर्गिक इंधनवायूच नाही तर कच्चे तेल व कोळशाचाही समावेश आहे. महासंघातील आघाडीचा देश असणार्‍या जर्मनीने इंधनविषयक निर्बंधांना विरोध करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचा दावा युरोपिय अधिकारी करीत आहेत. कोळशाच्या आयातीवर निर्बंध टाकण्यासंदर्भात महासंघाकडून साधे संकेतही देण्यात आलेले नाहीत, याकडे महासंघाच्या अधिकार्‍यांनी लक्ष वेधले. युरोपिय महासंघाला पुरविण्यात येणार्‍या नैसर्गिक इंधनवायूपैकी ४० टक्के इंधनवायू तर कच्च्या तेलापैकी जवळपास २५ टक्के हिस्सा रशियातून आयात होतो.

त्यामुळे बाल्टिक देशांसह अनेक देशांचा विरोध असतानाही युरोपातील मोजक्या देशांनी रशियाच्या इंधनावरील निर्यातीला जोरदार विरोध केला असून ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचे दिसून आले आहे. महासंघाने लादलेल्या निर्बंधांचा सर्वाधिक फटका रशियाला बसायला हवा, युरोपिय देशांना नाही, अशा शब्दात बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डे क्रू यांनी निर्बंधांबाबत महासंघात असलेल्या मतभेदांकडे लक्ष वेधले. युरोपिय देश स्वतःशीच युद्ध लढत नाहीत, असे सूचक उद्गारही त्यांनी काढले. तर, युरोप जोपर्यंत रशियाकडून इंधन घेत राहिल तोपर्यंत आपण त्यांच्या युद्धाला अर्थसहाय्य पुरवित आहोत, याची जाणीव ठेवा अशा शब्दात फिनलंडने निर्बंधांबाबत आग्रही भूमिकेचे समर्थन केले.

दरम्यान, रशियन इंधनावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी युरोपिय महासंघाने अमेरिकेबरोबर इंधन भागीदारी करार केला आहे. महासंघाच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डेर लेयन यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीनंतर याची घोषणा केली. या करारानुसार, अमेरिका व सहकारी देश युरोपिय देशांना करण्यात येणारा इंधनपुरवठा १५ अब्ज घनमीटरपर्यंत वाढविणार आहेत. अमेरिका युरोपला इंधनाच्या साठ्यांसाठी नव्या सुविधा उभारण्यास सहाय्य करणार असून स्वच्छ ऊर्जेसाठीही मदत करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

leave a reply