देशहितानुसार भारत परराष्ट्र धोरणाबाबतचे निर्णय घेतो

-परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा अमेरिकेला टोला

परराष्ट्रमंत्री जयशंकरनवी दिल्ली – रशिया व युक्रेनमधील संघर्षाबाबतची भारताची भूमिका ठाम व सातत्यपूर्ण आहे. या क्षेत्रात भारताला शांतता अपेक्षित असून भारत त्याचाच पुरस्कार करीत असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. त्याचवेळी रशियाबरोबरील व्यापाराचा आणि युक्रेनच्या युद्धाचा संबंध जोडता येणार नाही, याचीही जाणीव परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली. आपले सिद्धांत, देशहित आणि हितसंबंध लक्षात घेऊन भारत निर्णय घेतो, असा संदेश यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिला. त्यांचा रोख अमेरिकेकडे होता, असे माध्यमांचे म्हणणे आहे.

हिंसा व संघर्ष त्वरित रोखणे, राजनैतिक वाटाघाटी सुरू करणे, कायदे व संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांच्या चौकटीवर आधारलेली जागतिक व्यवस्थेचा पुरस्कार; संघर्षग्रस्तांसाठी मानवी सहाय्याचा मार्ग खुला करणे तसेच संघर्षग्रस्त देशांना मानवी सहाय्याचा पुरवठा, तसेच रशिया व युक्रेनशी संवाद कायम ठेवणे, अशा सहा सिद्धांतावर भारत ठाम आहे. युक्रेनच्या युद्धाशी आपले काही देणेघेणे नाही, असे काही भारताचे म्हणणे नाही. तर भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे व म्हणूनच भारताने याबाबत तटस्थ भूमिका स्वीकारलेली आहे, असा खुलासाही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला. भारताच्या पंतप्रधानांनी रशिया व युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करून ही भूमिका त्यांच्यासमोर मांडली होती, याकडे परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले.

युक्रेनवर हल्ला चढविणार्‍या रशियाचा निषेध करताना भारत कचरत असल्याची टीका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली होती. यासंदर्भात अमेरिका भारताशी चर्चा करीत असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय सातत्याने सांगत आहे. भारताने रशियाच्या विरोधात भूमिका घ्यावी, याकरीता दबाव टाकण्याठी अमेरिकी परराष्ट्र विभागाच्या उपमंत्री व्हिक्टोरिया नुलँड भारताच्या भेटीवर आल्या होत्या. त्यानंंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी राज्यसभेत बोलताना पुन्हा एकदा युक्रेनमधील युद्धाबाबतची भारताची भूमिका स्पष्ट केल्याचे दिसते.

भारताचे परराष्ट्र धोरण देशहिताचा विचार करून निर्धारित केले जाते. देशाचे विचार, सिद्धांत आणि हितसंबंध लक्षात घेऊनच भारत परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर निर्णय घेतो. युक्रेनच्या युद्धाचा व्यापारी निर्णयांशी संबंध जोडता येणार नाही, असे सांगून रशियाकडून भारत खरेदी खरेदी करीत असलेल्या इंधनाच्या मुद्यावरील वाद परराष्ट्रमंत्र्यांनी निकालात काढला.

leave a reply