युरोपिय महासंघ इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी घोषित करणार

इराणची युरोपिय महासंघावर टीका

Iran Revolutionary Guardबर्लिन/तेहरान – इराणमधील निदर्शकांवर कारवाई करणाऱ्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटनेच्या यादीत सामील करण्याचा विचार युरोपिय महासंघ करीत आहे. लवकरच महासंघाकडून अशी कारवाई केली जाईल, अशी घोषणा जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ॲनालिना बेरबॉक यांनी केली. आपल्या प्रमुख लष्करी संघटनेवरील संभाव्य कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या इराणने जर्मनीसह युरोपिय महासंघातील सदस्य देशांवर टीकास्त्र सोडले. तसेच अशी कारवाई केली तर इराणबरोबरचे द्विपक्षीय संबंध बिघडतील, असा इशारा इराणने दिला.

गेल्या सहा आठवड्यांपासून इराणमध्ये भडकलेली निदर्शने पांगविण्यासाठी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी केलेली कारवाई मानवाधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याची टीका अमेरिका व युरोपिय देशांमधून होत आहे. युरोपमध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर निर्बंध लादण्याची मागणी जोर पकडत असल्याचा दावा जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री बेरबॉक यांनी केला होता. यासाठी युरोपिय महासंघ लवकरच रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटनेच्या यादीत सामील करू शकते. असे झाले तर इराणच्या लष्करी गटावरील निर्बंधांची कारवाई सोपी होईल, असे संकेत जर्मन परराष्ट्रमंत्र्यांनी दिले.

eu germany baerbockयामुळे खवळलेल्या इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने जर्मनीसह युरोपिय महासंघावर निशाणा साधला. ‘जर्मनी व युरोपिय महासंघ इराण आणि येथील जनतेबाबत चुकीचा निर्णय घेत आहे. संबंधित देश व संघटना आपल्या निर्णयावर फेरविचार करतील आणि इराणबरोबरचे संबंध बिघडणार नाहीत, यासाठी प्रयत्न करतील. राजकीय आणि भावनिक निर्णयांना प्राधान्य देणार नाहीत’, असा विश्वास इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला.

याआधीच अमेरिकेने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सना दहशतवादी संघटनेच्या यादीत ठेवले आहे. २०१५ सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी उत्सूक असलेल्या बायडेन प्रशासनाबरोबर चर्चा करताना इराणने रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला या यादीतून बाहेर काढण्याची मागणी केली होती. बायडेन प्रशासनाने यासंबंधी तयारी केली होती. पण देशांतर्गत विरोध व इस्रायलकडून यावर तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर बायडेन प्रशासनाला यातून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे हा अणुकरार रखडला आहे. अशा परिस्थितीत युरोपिय महासंघाने देखील रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटनेच्या यादीत सामील करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेला इराण महासंघाला त्याविरोधात बजावत असल्याचे दिसते.

दरम्यान, रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटनेच्या यादीत ठेवल्यास, इराक, सिरियामधील रिव्होल्युशनरी गार्डस्‌‍वरील आर्थिक तसेच लष्करी कारवाईचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे इराण महासंघाला इशारा देत असल्याचे दिसत आहे.

leave a reply