तालिन – युरोपिय देशांमधील महत्त्वाच्या ऊर्जासंबंधी पायाभूत सुविधांची ‘स्ट्रेस टेस्ट’ अर्थात चाचणी घेणार असल्याची माहिती युरोपियन समितीच्या अध्यक्षा उर्सुला वोन दर लेन यांनी दिली. काही दिवसांपूर्वी बाल्टिक समुद्रातील नॉर्ड स्ट्रिम पाईपलाईनमध्ये घातपात घडविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महासंघाकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात युरोपिय देशांना इंधन पुरविणाऱ्या ‘नॉर्ड स्ट्रिम 1’ या पाईपलाईनमध्ये चार ठिकाणी स्फोट झाले होते. यामुळे सदर क्षेत्रात वायूगळती झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. युरोपिय देशांचा इंधनपुरवठा खंडीत करण्यासाठी हा स्फोट घडविला असून यासाठी पाश्चिमात्य देशांनी रशियाला जबाबदार धरले होते. याचा उल्लेख टाळून युरोपियन समितीच्या अध्यक्षा उर्सुला यांनी युरोपिय देशांनी स्वत:च्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे एजंट्स याच भागात होते, असे सांगून रशियाने या स्फोटांसाठी अमेरिकेवर निशाणा साधला होता. तर काही तासांपूर्वी या पाईपलाईनच्या हद्दीत स्फोटके आढळली होती, अशी माहिती रशियन कंपनीने दिली आहे. काही वर्षांपूर्वी सदर सागरी क्षेत्रात नाटोचा युद्धसराव सुरू असताना, पाईपलाईनच्या क्षेत्रात स्फोटके सापडली होती, याकडे रशियन कंपनीने लक्ष वेधले आहे.