युरोपिय महासंघाने निर्बंधांची भाषा सोडून रशियाबरोबर चर्चा करावी – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन

पॅरिस – ‘रशियाच्या बाबतीत युरोपिय महासंघाने टाकलेल्या निर्बंधांनी काम केलेले नाही. तेव्हा महासंघाने आपल्या परराष्ट्र धोरणात बदल करून रशियावर निर्बंध लादण्यापेक्षा आपल्या भूमिकेवर फेरविचार करावा’, अशी सूचना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी केली. बेलारूसच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा युरोपिय महासंघविरूद्ध रशिया एकमेकांसमोर खडे ठाकत असताना, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हे आवाहन केले आहे. याआधी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनीही रशियाबरोबर सहकार्याची भूमिका स्वीकारली होती.

इमॅन्यूअल मॅक्रॉनब्रुसेल्स येथे पार पडलेल्या युरोपिय महासंघाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी रशियाबाबतच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता असल्याचे सांगितले. याआधी युक्रेन तसेच नॅव्हॅल्नी प्रकरणावरुन महासंघाने रशियावर निर्बंध लादले होते. पण त्याचा परिणाम रशियावर झालेला नाही, याकडे मॅक्रॉन यांनी लक्ष वेधले. नॅव्हॅल्नी प्रकरणावरुन माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सडतोड भूमिका मांडली.

‘रशियाविरोधात काय करावे, अशी तुमची इच्छा आहे? रशियाविरोधात लष्करी संघर्ष हवा आहे का? की पूर्णपणे संबंध तोडून टाकायचे आणि अधिक निर्बंध लादायचे का? पण कधीपर्यंत हे चालू राहणार?’, असे सवाल मॅक्रॉन यांनी केले. त्याचबरोबर ‘रशियाबरोबरच्या संबंधावरुन आपल्याला सत्य स्वीकारण्याची वेळ आलेली आहे’, असे सांगून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी महासंघाच्या परराष्ट्र धोरणात बदलांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.

इमॅन्यूअल मॅक्रॉनरशियन राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा केली तर त्यांची युरोपबाबतची उद्दिष्टे स्पष्ट होतील. त्यानंतर युरोपिय महासंघ नेमकी भूमिका घेऊ शकतो, असे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सुचविले. याआधी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनीही रशियाबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर जर्मनीने रशियाबरोबर केलेल्या ‘नॉर्डस्ट्रिम 2’ गॅस पाईपलाईन सहकार्याचेही समर्थन केले होते.

पण महासंघातील इतर देश रशियाबरोबर जुळवून घ्यायला तयार नाहीत. याउलट रशियाच्या ‘आर्क्टिक एलएनजी 2’ या गॅस प्रकल्पातून फ्रान्स, जर्मनी आणि इटलीने गुंतवणूक मागे घ्यावी, असे आवाहन युरोपिय महासंघाकडून केले जात आहे. रशियन प्रकल्पांमधील गुंतवणूक सुरक्षित नाही व असे करणे महासंघाच्या धोरणाविरोधात असल्याचा दावा महासंघाच्या संसदेच्या काही सदस्यांनी केला आहे. दरम्यान, रशियाने बेलारूसच्या मुद्यावरुन युरोपिय देशांची अडवणूक सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. बेलारूसची हवाईहद्द वगळून रशियात प्रवेश करणार्‍या विमानांना रशियाने प्रवेश नाकारल्याचा आरोप होत आहे.

leave a reply