गेल्या वीस वर्षांच्या काळात अफगाणिस्तानने कमावलेले सारे काही नष्ट झाले

- भारतात आलेल्या अफगाणी संसदेच्या सदस्यांचा आक्रोश

नवी दिल्ली – रविवारी अफगाणिस्तानात अडकलेल्या जवळपास 400 जणांना भारतात आणण्यात आले. यामध्ये अफगाणिस्तानच्या संसदेचे सदस्य असलेल्या दोनजणांचा समावेश आहे. ‘गेल्या वीस वर्षात अफगाणिस्तानने जे काही कमावले होते, ते सारे नष्ट झाले आहे’, असे हताश उद्गार भारतात आलेले अफगाणी संसदेचे सदस्य नरेंदर सिंग खालसा यांनी काढले आहेत. अफगाणिस्तानातील भयंकर परिस्थिती लक्षात घेऊन अजूनही या देशात अडकून पडलेल्या हिंदू वशिखांना बाहेर काढून भारताने आश्रय द्यावा, असे कळकळीचे आवाहन खालसा यांनी केले आहे.

गेल्या वीस वर्षांच्या काळात अफगाणिस्तानने कमावलेले सारे काही नष्ट झाले - भारतात आलेल्या अफगाणी संसदेच्या सदस्यांचा आक्रोश168 जणांना घेऊन भारतीय वायुसेनेचे ‘सी-17’ विमान दिल्लीजवळील हिंडन तळावर उतरले. यामध्ये 107 भारतीयांचा तसेच 23 अफगाणी शीख व हिंदूंचा समावेश आहे. तसेच दुसऱ्या विमानाने काबुलमधून कतारमध्ये गेलेल्या भारतीय व अफगाणींना मायदेशी आणण्यात आले. यात 135 भारतीयांचा समावेश आहे. तसेच अफगाणी संसदेचे सदस्य असलेले नरेंदर सिंग खालसा व अनारकली होनारयार यांचा व त्यांच्या कुटुंबांचा समावेश आहे. नरेंदर सिंग खालसा यांनी आपल्याला अफगाणिस्तानात आलेल्या विदारक अनुभवाविषयी माध्यमांना सांगितले.

तालिबानकडे अफगाणिस्तानचा ताबा आल्यानंतर भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या देशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू व शिखधर्मियांनी गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे. तालिबानचे काहीजण येऊन आम्ही तुमचे संरक्षण करू असे आश्‍वासन देत आहेत. पण तालिबानमध्ये बरेच गटतट आहेत. त्यांच्यापैकी नक्की कुणाशी बोलायचे तेच कळत नाही, असे खालसा म्हणाले. काबुल विमानतळासाठी निघाल्यानंतर रस्त्यात आपल्याला तालिबानच्या दहशतवाद्यांनी रोखले आणि माघारी फिरण्याची सूचना केली. आमच्या सोबत असलेल्या भारतीयांना त्यांनी दहशतीखाली ठेवले होते, असे खालसा पुढे म्हणाले.

अखेरीस विशेष व्यवस्था झाल्यामुळे आम्ही विमानतळापर्यंत पोहोचलो. मात्र तालिबानच्या राजवटीमुळे धोक्यात असलेले कितीतरी हिंदू व शीख अफगाणिस्तानात आहेत. भारत सरकारने त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावे, असे कळकळीचे आवाहन खालसा यांनी केले. ‘भारत हे आमचे दुसरे घर आहे. अफगाणिस्तानात असताना आमचा उल्लेख हिंदुस्तानी असाच केला जात होता’, असे सांगून आपली सुटका करणाऱ्या भारत सरकारचे खालसा यांनी मनापासून आभार मानले आहेत.

सारेकाही मागे टाकून अफगाणिस्तान सोडताना अतिशय वाईट वाटले. यासाठी आक्रोश करावासा वाटत आहे. पण अफगाणिस्तान सोडण्यावाचून आपल्यासमोर पर्याय नव्हता, अशा शब्दात खालसा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गेल्या वीस वर्षांच्या काळात अफगाणिस्तानने कमावलेले सारे काही नष्ट झाले - भारतात आलेल्या अफगाणी संसदेच्या सदस्यांचा आक्रोशदरम्यान, अफगाणिस्तानातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सरकारने अधिक वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत. पण काबुल विमानतळावरील परिस्थिती बिकट बनल्याने हे काम अधिकच अवघड बनले आहे. अशा स्थितीत भारताला दरदिवशी दोन विमाने काबुलमध्ये पाठविण्याची परवानगी मिळालेली आहे. गेल्या महिन्यापासून काबुलमधून आणलेल्या भारतीयांची संख्या 560 वर गेल्याचे सांगितले जाते. तर भारतात आश्रयासाठी धाव घेत असलेल्या अफगाणींची आता तालिबानने कसून चौकशी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. अफगाणींनी हा देश सोडण्याची गरज नाही, असे तालिबानचे प्रवक्ते सांगत आहेत खरे. पण तालिबानचा निर्दय व क्रूर चेहरा जगासमोर येत असताना, पुढच्या काळात तालिबानकडून अल्पसंख्यांकांवर भयंकर अत्याचाराचे सत्र सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. सर्वसामान्य अफगाणी जनतेलाही या दहशतीने ग्रासलेले आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यांक भेदरलेल्या स्थितीत असून भारताकडून सहाय्याची अपेक्षा करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील हिंदू व शीखधर्मियांना भारतात आश्रय देण्याची तयारी केंद्र सरकारने दाखविली होती. शेजारच्या देशातील ही परिस्थिती लक्षात घेता, ‘सीएए’ अर्थात सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टची फार मोठी आवश्‍यकता पुन्हा एकदा सिद्ध होत असल्याचे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले आहे.

leave a reply