हंगेरी, रोमानिया, पोलंडमार्गे युक्रेनमधील भारतीयांना बाहेर काढणार 

भारतीयांना बाहेरनवी दिल्ली – युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणानंतर हवाई सीमा बंद झाल्याने येथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी युक्रेनच्या शेजारी देशातून मदत केली जाणार आहे. हंगेरी, पोलंड, स्लोवाकीया, रोमानिया या युक्रेन शेजारील चार देशांच्या सीमेद्वारे भारतीयांना युक्रेनमधून सुरक्षित ठिकाणी पोहोचविले जाणार असून यासंदर्भातील योजना तयार करण्यात आली आहे. तसेच मदतीसाठी हंगेरी, पोलंड, स्लोवाकीया, रोमानियामधील भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांचे दूरध्वनी आणि कोणत्या चौकीमधून भारतीयांना युक्रेनमधील बाहेर काढले जाईल, याचे तपशील जाहीर करण्यात आले आहेत.

भारतीयांना युक्रेन सोडण्याची ऍडव्हायझरी भारत सरकारने गेल्या आठवड्यातच जारी केली होती. गेल्या दोन आठवड्यात युक्रेनमधील भारतीय दूतावासाने तीन ऍडव्हायझरी जारी केल्या होत्या. मात्र फार कमी जणांनी युक्रेन सोडण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी तिसरी ऍडव्हाजरी जारी करताना लवकरात लवकर युक्रेन सोडा आव्हान भारतीय दूतावासाने केले होते व भारतीयांना आणण्यासाठी विशेष विमानांचीही सोय केली होती. एअर इंडियांच्या विमानांमधून काही भारतीय मायदेशात परतले आहेत. मात्र २० हजार भारतीयांपैकी १५ हजार भारतीय अजून युक्रेनमधील विविध भागात आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचा हवाई मार्ग बंद करण्यात आला, त्यामुळे एअर इंडियाने आपली युक्रेनसाठीची उड्डाने थांबवली आहेत. येथील भारतीयांना हवाई मार्गाने कतारमध्ये व तेथून कतार-भारत विमानाद्वारे भारतात येता येईल.

मात्र याशिवाय भूमार्गानेही भारतीयांना बाहेर काढण्यात येणार आहे. युक्रेनच्या शेजारील देश असलेल्या हंगेरी, पोलंड, स्लोवाकीया, रोमानियाच्या सीमेद्वारे भारतीयांना हलविण्यात येणार आहे. या देशांच्या दूतावासांनी यासाठी पुर्ण तयारी केली आहे. युक्रेनमध्ये हंगेरी सीमेवर येणे सोयीचे असणार्‍यांना युक्रेन-हंगेरी सीमेवरील झाओन्या चौकीवर आणून त्यांनी सुरक्षित स्थळी हलविण्यात येईल. तर पोलंड सीमेवरील क्राकोविक येथील चौकीवर भारतीयांना बाहेर काढले जाईल. स्लोवाकीया सीमेवरील व्हेस्ना आणि रोमानियाला लागून असलेल्या सुसॅव्हा सीमेवरून भारतीयांना हलविण्याची योजना आखण्यात आली आहे.

दरम्यान, युक्रेनच्या दूतावासाने सर्व १५ हजार भारतीय सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. जेथे असाल तेथेच थांबा. सर्व भारतीयांना अन्न आणि पाणी व इतर मदत पुरविली जाईल, असे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे. किवमधील भारतीय दूतावासाजवळ युक्रेनमधील भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याच्या बातम्या आहेत.

leave a reply