ब्रिटनमधील अतिडाव्या विचारसरणीच्या गटांची चौकशी होणार

- पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे आदेश

लंडन – ब्रिटनमध्ये वंशद्वेष व हवामानबदल यासारख्या मुद्यांवर होणार्‍या आंदोलनांमध्ये घुसखोरी करणार्‍या आक्रमक व अतिडाव्या गटांची चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिले आहेत. पंतप्रधानांचे विशेष दूत व सल्लागार जॉन वुडकॉक यांच्या नेतृत्त्वाखाली ही चौकशी करण्यात येणार आहे. ‘प्रस्थापित राजकीय व्यवस्था व जनता उदारमतवादाचा पुरस्कार करणार्‍या सामाजिक चळवळींकडे सहानुभूतीने पाहते. त्याचा गैरफायदा उचलून पुरोगामी अतिरेकीवादाचे पुरस्कर्ते हिंसाचार व गोंधळ माजविण्याचा प्रयत्न करीत असून ही गंभीर बाब ठरते’, या शब्दात जॉन वुडकॉक यांनी चौकशीचे समर्थन केले आहे.

गेल्याच आठवड्यात जर्मनीतील डाव्या पक्षाच्या आघाडीच्या व लोकप्रिय नेत्या सारा वागक्नेश्ट यांनी, जर्मनीतील डाव्या विचारसणीचे गट अत्यंत ढोंगी प्रवृत्तीचे असल्याचे टीकास्त्र सोडले होते. यावेळी त्यांनी, कथित डाव्या उदारमतवादी विचारसरणीच्या गटांमधील वाढत्या असहिष्णुतेमुळे या देशाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराही दिला होता. त्यापूर्वी अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या वरिष्ठ नेत्या निक्की हॅले तसेच माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, नवे बायडेन प्रशासन डाव्या विचारसरणीच्या गटाच्या ताब्यात जाईल असे बजावले होते. या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी देशातील आक्रमक व अतिडाव्या गटांच्या चौकशीचे आदेश देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

जॉन वुडकॉक पुढील तीन महिन्यात आपला अहवाल पंतप्रधान जॉन्सन व गृहमंत्री प्रीति पटेल यांच्याकडे सोपविणार असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात ब्रिटनमधील आघाडीच्या दैनिकाला माहिती देताना, वुडकॉक यांनी ‘सोशॅलिस्ट वर्कर्स पार्टी’ तसेच ‘युनाईट अगेन्स्ट फॅसिझम’ व ‘एक्सटिंक्शन रिबेलिअन’ या गटांचा उल्लेख केला. ब्रिटनमधील अतिडाव्या विचारसणीचा पक्ष म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘सोशॅलिस्ट वर्कर्स पार्टी’ने ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’सह हवामानबदल व इतर सामाजिक मुद्यांवर होणार्‍या आंदोलनात घुसखोरी केल्याचे दावे समोर आले आहेत.

अतिडाव्या गटांच्या या घुसखोरीनंतर आंदोलनात हिंसक व अराजकवादी घटनांचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले होते. ब्रिटनमधील काही संसद सदस्य तसेच मंत्र्यांनी याकडे लक्ष वेधताना अशा गटांचे वर्तन अस्वीकारार्ह असल्याचे जाणीव करून दिली होते. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल यांनी, ‘एक्सटिंक्शन रिबेलिअन’ या गटात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घुसल्याचा आरोप करून हा गट वाढता धोका असल्याचा आरोप केला होता. वुडकॉक यांनी, अतिडाव्या विचारसरणीचे आक्रमक गट लोकशाही व भांडवलशाहीविरोधी असून उजव्या विचारसरणीच्या गटांपेक्षा अधिक हानी पोहोचविणारे असल्याचा दावाही केला.

leave a reply