अमेरिकी निर्बंध व कोरोनामुळे इराणच्या रियालची मोठी घसरण

तेहरान – अमेरिकेने गेल्या महिन्यात लादलेले निर्बंध, कोरोनाचा वाढता फैलाव आणि इंधनदरांमध्ये झालेली घट या पार्श्वभूमीवर इराणचे चलन असणाऱ्या रियालच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. शनिवारी राजधानी तेहरानमध्ये एका अमेरिकी डॉलरसाठी तब्बल एक लाख ९३ हजार ४०० रियाल मोजावे लागत होते, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. ही घटना इराणची अर्थव्यवस्था डबघाईला आल्याच्या दाव्यांना दुजोरा देणारी ठरते.

अमेरिकी निर्बंध, कोरोना, इराण, रियाल

गेल्याच महिन्यात इराण नागरी अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करुन अमेरिकेने इराणवरील निर्बंधांचा फास अधिकच घट्ट आवळला होता. यावेळी २०१५ सालच्या अणुकरारांतर्गत इराणला मिळालेली शेवटची सवलतही अमेरिकेने काढून घेतली होती. यामुळे रशिया, चीन आणि युरोपीय देशांकडून इराणच्या अराक या नागरी अणुप्रकल्पाला मिळणारे सहाय्य देखील यापुढे अमेरिकेच्या निर्बंधांच्या कचाट्यात आले होते. इराण आपल्या लष्करी उद्दीष्टांसाठी अराक अणुप्रकल्पाचा वापर करीत असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.

नव्या निर्बंधांद्वारे अमेरिकेने इराणवरील दबाव वाढविला आहे, अशी माहिती अमेरिकेने इराणसाठी नियुक्त केलेले विशेष दूत ब्रायन हूक यांनी दिली होती. त्याचबरोबर इराणला सवलत हवी असल्यास, अमेरिकेशी चर्चा करावी, अन्यथा या निर्बंधांमुळे आपली अर्थव्यवस्था भुईसपाट करुन घेण्यासाठी इराणने तयार राहावे, असेही अमेरिकी दूतांनी बजावले होते. पण इराणने अमेरिकेचे प्रस्ताव धुडकावला होता. इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी अमेरिकेने केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत, असे प्रत्युत्तर इराणकडून देण्यात आले होते.

अमेरिकी निर्बंध, कोरोना, इराण, रियाल

इराणमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची साथ सुरू असून त्यात साडेनऊ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांहून अधिक झाली असून संसर्ग रोखण्यात इराण सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे. अमेरिकेने टाकलेल्या निर्बंधांमुळे इराणी जनतेला आवश्यक उपचार उपलब्ध करून देता येत नसल्याचे सांगून इराण सरकारने हे अपयश अमेरिकेवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र त्याचवेळी इराणच्या राजवटीने आपल्या अणुकार्यक्रमापासून माघार घेण्यास नकार दिला असून सीरिया, इराक व येमेनमधील दहशतवादी संघटनांना करण्यात येणारे सहाय्यही कायम ठेवले आहे. अमेरिकेने निर्बंध टाकलेल्या व्हेनेझुएलाला इराणकडून मोठ्या प्रमाणात इंधनपुरवठाही सुरु आहे. पण हीच इराणी राजवट देशातील जनतेला आर्थिक पातळीवर दिलासा देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसते.

इराणच्या अर्थव्यवस्थेतील महागाईचा दर सरासरी ४१ टक्क्यांच्या वर गेला असून मांसाहारी उत्पादने व इतर अन्नधान्यांच्या किमतींमध्ये तब्बल ११६ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. इराणच्या बजेटमधील आर्थिक तूटही ६० टक्‍क्‍यांच्या वर गेल्याचे सांगण्यात येते. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर इंधनाची मागणी व दर दोन्ही कोसळले असून त्यातून इराणला कोणत्याही प्रकारचे सहाय्य मिळण्याची शक्यता नाही.

या सर्वांचा परिणाम इराणी चलन रियालच्या मूल्यावर झाला असून गेल्या चार महिन्यात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तब्बल ५० हजारांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात एका अमेरिकी डॉलरसाठी १ लाख ४० हजार रियाल मोजावे लागत होते. मात्र आता एका डॉलरचे मूल्य तब्बल १ लाख९३ हजार ४०० रियालपर्यंत जाऊन पोहोचले आहे. येत्या काही दिवसात हेच मूल्य दोन लाखांपर्यंत उसळी घेऊ शकेल असा दावा स्थानिक सूत्रांनी केला.

leave a reply