जलद, पारदर्शक निर्णयांमुळे संरक्षणसिद्धता अधिकच वाढते

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – जलदगतीने घेतलेल्या पारदर्शक निर्णयामुळे देशाची संरक्षणसिद्धता अधिकच भक्कम होते. तसेच संरक्षणसिद्धता वाढविण्यासाठी प्रत्येक स्त्रोताचा संपूर्णपणे वापर करणे आवश्यक ठरते, असा संदेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला. ‘डिफेन्स अकाऊंट्‌‍स डिपार्टमेंट-डीएडी’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग बोलत होते. त्याचवेळी या वित्तीय वर्षात देशाच्या संरक्षणखर्चासाठी करण्यात आलेली सुमारे ५.२५ लाख कोटी रुपयांची तरतूद पुढच्या वर्षी ६ लाख कोटी रुपयांपुंढे नेण्याची आवश्यकता असल्याचे सूचक उद्गार संरक्षणमंत्र्यांनी काढले आहेत.

डीएडीने आयोजित केलेल्या ‘कंट्रोलर्स कॉन्फरन्स २०२२’मध्ये बोलताना संरक्षणमंत्र्यांनी उपलब्ध असलेल्या स्त्रोतांचा संपूर्ण वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जगभरात स्त्रोत मर्यादितच असतात, त्यामुळे त्याचा यथोचित वापर करायला हवा. बचत केलेला प्रत्येक पैसा म्हणजे कमाई केलेल्या पैशासारखा ठरतो, या पारंपरिक शहाणपणाचा उल्लेख करून स्त्रोतांच्या बाबतीत देखील हे तितकेच खरे ठरते, असे संरक्षणमंत्री म्हणाले. संरक्षणदलांसाठी उपलब्ध असलेले स्त्रोत संपूर्णपणे वापरले गेले पाहिजे. त्याचवेळी शक्य असेल तिथे याची बचत करायला हवी, असा संदेश राजनाथ सिंग यांनी दिला.

संरक्षणसिद्धतेसाठी जलदगतीने, पण पारदर्शक निर्णय घेणे अत्यावश्यक ठरते. यासाठी विलंब झाला तर त्याचा परिणाम संरक्षणसिद्धतेवर होतो, असे सांगून सरकारला याची जाणीव असल्याचे राजनाथ सिंग म्हणाले. या वित्तीय वर्षासाठी संरक्षणदलांना सुमारे ५.२५ लाख कोटी इतका निधी मंजूर झाला. हा निधी योग्यरितीने वापरण्याची जबाबदारी डीएडीवर असल्याचेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंग पुढे म्हणाले. जर सरकार संरक्षणावर आवश्यकतेपेक्षा कमी खर्च करीत असेल, तर तो खर्च कुठे आणि किती प्रमाणात वाढवायचा, ही बाब डीएडीने लक्षात आणून द्यावी. अन्यथा पुढच्या अर्थसंकल्पात समस्या निर्माण होईल, असे संरक्षणमंत्र्यांनी परखडपणे बजावले आहे.

याबरोबरच चालू वित्तीय वर्षात देशाचा संरक्षणखर्च ५.२५ लाख कोटी रुपयांवर असून पुढच्या वित्तीय वर्षात ही तरतूद ६ लाख कोटी रुपयांच्या पुढे नेणे आवश्यक ठरते. मात्र त्यासाठी आधी मिळालेला निधी योग्यवेळी वापरणे गरजेचे आहे. लेखपालांनी ही बाब लक्षात घ्यावी, असे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी केले आहे.

leave a reply