वुहान लॅब लीक प्रकरणी चिनी संशोधिकेचे अमेरिकेच्या आरोग्यविषयक सल्लागारांवर गंभीर आरोप

वॉशिंग्टन – अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे आरोग्यविषयक सल्लागार डॉ. फॉसी यांचा ईमेलद्वारे झालेला सुमारे तीन हजार पानांचा संवाद जगजाहीर झाला आहे. यामुळे अनेक धक्कादायक माहिती समोर आली असून यावर गंभीर आरोपांचे नवे सत्र सुरू झाले आहे. चिनी संशोधिका डॉ. ली-मेंग यान यांनी या ईमेल्समुळे फार मोठी माहिती हाती लागली असून आपण कोरोनाबाबत चीनवर केलेले आरोप यामुळे सिद्ध झाल्याचे म्हटले आहे. तसेच डॉ. फॉसी यांनाही कोरोनाबाबतच्या चीनच्या कारस्थानाची सारी माहिती होती. पण त्यांनी ती माहिती दडवून ठेवली, असा आरोप डॉ. ली-मेंग यान यांनी केला.

आरोपसुमारे तीन हजार पानांचे ईमेल्स समोर आल्यानंतर, डॉ. फॉसी वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. याआधी डॉ. फॉसी यांनी कोरोनाचा विषाणू नैसर्गिक असल्याचे मान्य करून याबाबत चीनने केलेले दावे जसेच्या तसे स्वीकारले होते. तसेच यासंदर्भात चीनवर केल्या जाणार्‍या आरोपात वैज्ञानिक तथ्य नसल्याचा निर्वाळा डॉ. फॉसी यांनी दिला होता. आजही आपल्या या भूमिकेवर डॉ. फॉसी ठाम आहेत. पण डॉ. फॉसी यांचे ईमेल्स उघडकीस आल्यानंतर त्यांचे दावे धुडकावू लावले जात आहेत. वुहान येथील प्रयोगशाळेच्या प्रमुख संशोधक तसेच अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ अ‍ॅलर्जी अँड एन्फेक्शिअस डिसिजेस्’ यांना पाठविलेले व त्यांच्याकडून डॉ. फॉसी यांना आलेल्या ईमेलमध्ये खूपच वादग्रस्त माहिती आहे.

आरोपयामुळे डॉ. फॉसी यांना कोरोनाच्या उगमाची व चीनच्या कारस्थानाची पुरती माहिती होती, हे समोर येत असल्याचे दावे केले जातात. यानंतर डॉ. फॉसी यांच्या विरोधात अमेरिकेत संतापाची लाट आली आहे. कोरोनाच्या उगमाबद्दल अमेरिकेची फसवणूक करणारा खोटारडा इसम अशा शब्दात अमेरिकी माध्यमे डॉ. फॉसी यांची निर्भत्सना केली जात आहे. अमेरिकेच्या संसदेतही याचे पडसाद उमटले. डॉ. फॉसी यांच्या चौकशीची मागणी केली जात असून याचे दडपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर आले आहे. चिनी संशोधिका डॉ. ली-मेंग यांनी नवे आरोप करून फॉसी यांना धारेवर धरले आहे.

त्यांचे ईमेल्स जगजाहीर झाल्याने मी आत्तापर्यंत कोरोनाबाबत केलेल्या दाव्यांना दुजोरा मिळत असल्याचे डॉ. ली-मेंग म्हणाल्या. तसेच डॉ. फॉसी यांना फार आधीच चीनच्या कारस्थानाची माहिती मिळाली होती. पण आपल्या स्वार्थासाठी त्यांनी ही सारी माहिती दडवून ठेवली, असा ठपका डॉ. ली-मेंग यांनी ठेवला. यामुळे डॉ. फॉसी यांच्यासमोरील अडचणीत अधिकच वाढ होणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील डॉ. फॉसी यांच्यावर कठोर शब्दात टीका करून त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यांचे सल्ले मानले नाहीत, म्हणून आपण लाखो अमेरिकन नागरिकांचा जीव वाचविण्यात यशस्वी ठरलो, अशी जळजळीत टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

leave a reply