‘वुहान लॅब’चे अर्थसहाय्य बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला फॉसी यांनी त्यावेळी विरोध केला होता – नव्या पुस्तकातील दावा

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या ‘वुहान लॅब’चे अर्थसहाय्य बंद करण्यासाठी दिलेल्या आदेशांना सल्लागार अँथनी फॉसी यांनी विरोध केला होता. अमेरिकी पत्रकारांनी लिहिलेल्या पुस्तकातून ही माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे अँथनी फॉसी कोरोनाव्हायरसचे मूळ असलेल्या ‘वुहान लॅब’ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते, या आरोपांना नव्याने बळ मिळाले आहे. यासंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या सवालांना उत्तरे देण्याचे फॉसी यांनी टाळल्याचे समोर येत आहे.

2019 साली चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीचे मूळ वुहानमध्ये असल्याचा उल्लेख सर्वात आधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. गेल्या वर्षी ट्रम्प प्रशासनाला कोरोनाव्हायरसच्या फैलावामागे ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’चा संबंध असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट्स् ऑफ हेल्थ’ला वुहान लॅबला देण्यात येणारा निधी तात्काळ रद्द करावा, असे आदेश दिले होते.

मात्र सल्लागार फॉसी व ‘नॅशनल इन्स्टिट्यूट्स् ऑफ हेल्थ’ने ट्रम्प यांच्या आदेशाला विरोध केला, अशी माहिती नव्या पुस्तकात देण्यात आली आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे पत्रकार यास्मिन अबुतलेब व डॅमिअन पॅलेटा यांनी लिहिलेल्या ‘नाईटमेअर सिनॅरिओ: इनसाईड द ट्रम्प अ‍ॅडमिनिस्ट्रेशन्स रिस्पॉन्स टू द पॅन्डेमिक दॅट चेंज्ड् हिस्टरी’, नावाचे हे पुस्तक 29 जूनला प्रकाशित होणार आहे. फॉसी यांच्या सुरुवातीच्या विरोधानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून निर्वाणीचा इशारा देण्यात आला. त्यात आदेशाचे पालन केले नाही, तर राजीनामा द्यावा लागेल असे बजावण्यात आले होते, असा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.

सध्या राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे सल्लागार म्हणून काम करणार्‍या फॉसी यांनी कोरोनाव्हायरसबाबत सातत्याने उलटसुलट व दिशाभूल करणारी विधाने केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत. त्याचवेळी फॉसी यांच्याकडून ‘वुहान लॅब लीक थिअरी’ नाकारण्यात आली असून ते सीफूड मार्केटमधून कोरोना पसरला असावा, असे दावे करीत असल्याचेही समोर आले होते. यामागे फॉसी व वुहान लॅबमध्ये असलेले कथित संबंध हे कारण असल्याचे मानण्यात येते. नव्या पुस्तकातील दावे त्याला अधिक बळ देणारे ठरत आहेत.

दरम्यान, अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी 2009 साली वुहानमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ जैविक शस्त्रांच्या निर्मितीशी संबंधित असू शकते, या मुद्याकडे लक्ष वेधले होते असे वृत्त समोर आले आहे. ‘विकीलिक्स’ या गटाने उघड केलेल्या गोपनीय संदेशांमधून ही माहिती समोर आली आहे. 2009 साली ‘ऑस्ट्रेलिया ग्रुप’ या गटाची एक बैठक होणार होती. त्यापूर्वी पाठविलेल्या एका नोटमध्ये क्लिंटन यांनी बीजिंग तसेच वुहानमधील लॅब आणि चीनकडून जैविक शस्त्रांच्या निर्मितीसंदर्भात चालू असलेल्या हालचाली, या मुद्यांचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.

कोरोनाव्हायरसच्या उगमावरून चीनची कोंडी करणारी नवी माहिती समोर आली आहे. ब्रिटनच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ केंट’च्या संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या एका लेखात कोरोनाच्या साथीचा प्रसार ऑक्टोबर 2019मध्येच सुरू झाला होता, असा दावा करण्यात आला आहे. चीनने अधिकृत पातळीवर डिसेंबर 2019 मध्ये वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. मात्र त्यापूर्वीच चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती, असे ‘युनिव्हर्सिटी ऑफ केंट’च्या संशोधकांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेतील संशोधकांनी , चीनमधील संशोधकांच्या गटाने कोरोना रुग्णांची महत्त्वाची माहिती ‘डिलिट’ केल्याचे उघड केले होते.

leave a reply