कोरोनाची साथ रोखण्यासाठी महाराष्ट्रात पंधरा दिवसांची संचारबंदी

संचारबंदीमुंबई – कोरोनाच्या साथीचा उद्रेक झालेला असताना, ही साथ रोखण्यासाठी महाराष्ट्रात पंधरा दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. लॉकडाऊन न लावता लॉकडाऊनसदृश्य कडक निर्बंध लावण्यात आले असून जनतेने अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. बुधवार १४ एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होणार आहेत.

मंगळवारीही महाराष्ट्रात कोरोनानेे २८१ जण दगावले व ६० हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्रात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोनाच्या चोवीस तासात आढळणार्‍या नव्या रुग्णांची उच्चांकी नोंद होत आहेत. तसेच या साथीने होणार्‍या मृत्यूचा दरही वाढला आहे. राज्यात रुग्णालयांमध्ये बेड भरलेले असून कितीतरी रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. याशिवाय राज्यात निर्माण केला जाणारा सर्व ऑक्सिजन वैद्यकीय वापरूनही ऑक्सिजन कमी पडत आहे. मंगळवारी नालासोपार्‍यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सात जणांचा बळी गेला.

कोरोनामुळे अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना राज्य सरकारकडून गेल्या दोन आठवड्यापासून लॉकडाऊन लावण्याचे संकेत देण्यात येत होते. मात्र याबाबत तज्ज्ञ, सर्व पक्षांचे नेते आणि विविध घटकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यावर कडक लॉकडाऊन न लावता लॉकडाऊनसदृश्य निर्बंधांची घोषणा करण्यात आली. यानुसार बुधवारी रात्रीपासून पुढील पंधरा दिवस राज्यात कर्फ्यू अर्थात संचारबंदी असणार आहे. याआधी गेल्या एक आठवड्यापासून रात्रीची संचारबंदी सुरू होती. पण आता संपूर्ण संचारबंदी असणार आहे. केवळ अत्यावश्यक कारणासाठीच बाहेर पडण्याची मुभा आहे. आवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

या संचारबंदीच्या काळात रेल्वे आणि बस सेवा बंद राहणार नाही. मात्र याचा वापर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांकडून करण्यात येईल. पेट्रोलपंप, कॉर्गो सेवाही सुरू राहणार आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंटस् बंद राहणार असले तरी पार्सल सेवा सुरू राहणार आहे. याशिवाय रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणार्‍यांनाही अशीच मुभा देण्यात आली आहे. त्यांनाही येणार्‍या ग्राहकांना पार्सल देता येईल. बँका, दूरसंचार सेवा, सेबीने मान्यता दिलेली कार्यलये सुरू राहतील. तसेच बांधकांच्या ठिकाणी तेथील मजुरांना राहण्याची सोय करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

राज्यातील गरीब जनतेला या निर्बंधांच्या काळात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. अधिकृत फेरवाल्यांना सहाय्य म्हणून १५०० रुपये देण्यात येणार आहेत. बांधकाम कामगारांनाही असेच सहाय्य मिळणार आहे. तसेच तीन हजार, ३०० कोटी रुपयांची तरतूद राज्यात जिल्हा स्तरावर आरोग्य सुविधा उभारणी, औषधे यासाठी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यासाठी एकूण पाच हजार ४०० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

leave a reply