जनरल बिपीन रावत यांना अखेरचा निरोप

नवी दिल्ली – संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका, तसेच याच हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. शुक्रवारी दिल्ली कँन्ट भागातील ब्रार स्क्वेअर येथील स्मशानभूमीपर्यंत जनरल बिपीन रावत यांची अत्यंयात्रेत फार मोठा समुदाय सहभागी झाला होता. ‘बिपीन रावत अमर रहे…, भारतीय लष्कराचा विजय असो…, भारत माता की जय…’ असे घोष यावेळी आसमंतात निनादत होते.

जनरल बिपीन रावत यांना अखेरचा निरोपदोन दिवसांपूर्वी तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात संरक्षणदलप्रमुख बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि ११ लष्करी अधिकार्‍यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. भारतमातेच्या या शूर पुत्राच्या अकाली मृत्यूची बातमी मिळाल्यापासून संपूर्ण देशात शोकाकूल वातावरण आहे. गुरुवारी रात्री पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेल्या जनरल बिपीन रावत यांच्यासह इतर बारा जणांना श्रद्धांजली वाहिली होती. तसेच त्यांच्या कुटुंबियांचेही सांत्वन केले होते. शुक्रवारी सकाळी जनरल बिपीन रावत यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांचा व त्यांच्या पत्नीचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या निवासस्थानापासून ब्रार स्माशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा निघाली. जनरल रावत यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी दुतर्फा गर्दी झाली होती.

जनरल बिपीन रावत यांना अखेरचा निरोपब्रार स्मशानभूमीत ८०० लष्कर अधिकार्‍यांसह काही राजकीय नेते उपस्थित होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, लष्करप्रमुख, वायुसेनाप्रमुख, नौदलप्रमुखांसह इतर लष्करी अधिकारी व मान्यवरांनी जनरल रावत यांच्या पार्थिवावर पुष्पांजली वाहिल्यानंतर अत्यंविधी पार पडले. जनरल बिपीन रावत यांच्या दोन्ही मुलींनी हे अंतिम संस्कार केले व आपल्या मातापित्याला मुखाग्नी दिला. हे दृश्य पाहून सारा देश हळहळला.

मुखाग्नी देण्यापूर्वी जनरल रावत यांना लष्करी परंपरेप्रमाणे १७ तोफांची सलामी देण्यात आली. त्याआधी दुपारी ब्रार स्मशानभूमीतच ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांच्यावर लष्करी इंतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘पती गेल्याचे दु:ख फार मोठे आहे. मात्र ते सैनिक होत आणि मी सैनिकाची पत्नी आहे. त्यामुळे त्यांना हसूनच निरोप द्यायला हवा’, या ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिद्दर यांच्या पत्नी गितिका लिद्दर यांच्या उद्गाराने आणि त्यांच्या मुलीकडून त्यांना देण्यात येत असलेला अखेरचा निरोप पाहून सारा देश भावूक झाला.

leave a reply