नदीमार्गाने बांगलादेशमधून त्रिपुरामध्ये पहिले मालवाहू जहाज दाखल

मालवाहू जहाजअगरतळा – ५० मेट्रिक टन इतके सिमेंट घेऊन बंगालदेशमधून नदीमार्गाने निघालेले मालवाहू जहाज शनिवारी त्रिपुराच्या सोनामुरामध्ये पोहोचले. त्रिपुरा-बांगलादेशमध्ये नदी मार्गाने सुरु झालेली ही पहिली जलवाहतूक आहे. इतर जलवाहतूक प्रकल्पांवर काम सुरु आहे. विकसित करण्यात आलेल्या या अंतर्देशीय जलमार्गामुळे ईशान्य भारतातून बांगलादेशबरोबरील व्यापार वाढणार आहे.

बांगलादेशच्या दौकांडी बंदरातून मेघना नदीमार्गाने आणि पुढे त्रिपुरातील गोमती नदीमार्गे सोनमुरा बंदर असा ईशान्य भारतातील राज्यांसाठी जल वाहतूकीचा मार्ग लवकरच नियमित वाहतुकीसाठी खुला होईल. ८९.५ किलोमीटरच्या या जलमार्गावर चाचणी पार पडली आहे. गुरुवारी ५० मेट्रिक टन सिमेंट घेऊन दौकांडी बंदरातून निघालेले जहाज शनिवारी त्रिपुराच्या सोनामुरामध्ये दाखल झाले. यावेळी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव उपस्थित होते. तसेच केंद्रीय नौकावहनमंत्री मनसुख मांडवीय व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते.

मालवाहू जहाजभारत आणि बांगलादेश यांच्यात १९७२ साली ईशान्येकडील राज्यांबरोबर संपर्क मजबूत करण्यासाठी ‘प्रोटोकॉल फॉर इनलँड वॉटर ट्रेड ॲण्ड ट्रान्झिट’वर (पीआयडब्ल्यूटीटी) स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. आतापर्यंत आठ जलमार्ग खुले झाले असून गेल्यावर्षी या मार्गांवर ३.५ मेगा मॅट्रीक टन (एमएमटी) मालवाहतूक करण्यात आली होती. मात्र त्रिपुरातून पहिल्यांदाच नदीमार्गाने बांगलादेशबरोबर जलवाहतूक सुरु करण्यात आली आहे.

मालवाहू जहाजगेल्या महिन्यात बांगलादेशने सोनामुरा आणि दौकांडीदरम्यान जलवाहतुकीला मंजुरी दिली होती. त्रिपुरा सरकारने जहाज वाहतूक मंत्रालयाच्या सहाय्याने सोनमुरामध्ये तात्पुरते बंदर बांधले आहे, या बंदरातून मालाची ने-आण केली जाईल.यामुळे त्रिपुरातून बांगलादेशात होणारी निर्यात वाढेल. भारत आणि बांगलादेशमध्ये रस्ते आणि सागरी जलमार्गाने व्यापार सुरु आहे. नदी जलमार्गानेही व्यापारी वाहतूक सुरु झाल्याने दोन्ही देशातील व्यापारी संबंध अधिक मजबूत होतील असा विश्वास व्यक्त केला जातो.

leave a reply