भारताने सीमावाद भडकविल्याचा चीनचा कांगावा

नवी दिल्ली – एकाच दिवसापूर्वी भारताच्या संरक्षणमंत्र्यांशी द्वीपक्षीय चर्चा करण्यासाठी वारंवार विनंती करणार्‍या चीनने आता सीमावादाला भारतच जबाबदार असल्याचा कांगावा सुरू केला आहे. हा वाद भारतानेच निर्माण केला व तो सोडविण्याची जबाबदारी भारताचीच असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, शुक्रवारी मॉस्कोमध्ये पार पडलेल्या चर्चेत भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनला शांतता हवी असेल तर लडाखमधून सैन्य माघारी घेतल्यावाचून पर्याय नाही, असे खणखणीत शब्दात बजावले होते. भारताने स्वीकारलेल्या आक्रमक भूमिकेला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दाद दिली असून इथला तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे.

सीमावाद

शुक्रवारी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एस.सी.ओ) संरक्षणमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित असलेल्या चीनचे संरक्षणमंत्री ‘वे फेंग’ यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. सुरुवातीला चर्चेला नकार देणार्‍या भारताने अखेरीस या चर्चेला होकार दिला. मात्र, या चर्चेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लडाखच्या क्षेत्रातून चीनने संपूर्ण माघार घेतल्याखेरीज सीमेवर शांतता प्रस्थापित होणार नाही, असे ठासून सांगितले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या आक्रमकतेसमोर चीनला या चर्चेत नमते घ्यावे लागल्याचे वृत्त आहे. भारतीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरल्यानंतर दुसर्‍याच दिवशी चीनच्या भाषेत बदल झाला.

 

सीमावादशनिवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सीमावाद भारताच्या आक्रमकतेमुळेच निर्माण झाल्याचा कांगावा सुरू केला. तसेच हा वाद संपविण्याची जबाबदारीही भारताचीच आहे, असे सांगून भारतीय सैनिकांनी लडाखच्या क्षेत्रातून माघार घ्यावी, अशी मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. वरकरणी चीनही ताठर भूमिका घेत असल्याचे दाखवित असला तरी, प्रत्यक्षात भारतीय सैन्याने पँगाँग त्सो सरोवराच्या क्षेत्रात केलेल्या कारवाईमुळे चीनचे धाबे दणाणल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. म्हणूनच प्रचंड प्रमाणात लष्करी तैनाती करुन चीन भारतीय सैन्याला कसे थोपविता येईल, याचा विचार करीत आहे.

२९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री भारतीय सैनिकांच्या शौर्यासमोर चीनचे जवान टिकाव धरू शकले नाहीत, ही बाब आता जगजाहीर झाली आहे. यामुळे भारत चीनचा मुखभंग करणारे प्रत्युत्तर देऊ शकतो, हा संदेश सार्‍या जगाला पुन्हा एकदा मिळाला आहे. यामुळे झालेली मानहानी लपविण्यासाठी चीन धडपडत आहे. त्याचवेळी भारताबरोबर नवा संघर्ष छेडण्याचेही धाडस चीनकडे नाही. म्हणून चीनला आपली प्रतिष्ठा वाचविणारा तोडगा काढून लडाखमधून माघार घ्यायची आहे. पण तसे करीत असताना, आपण भारतासमोर माघार घेतली, असे चित्र उभे राहू नये यासाठी चीन केविलवाणे प्रयत्न करीत आहे.

सीमावाद

माघार घेता येत नाही आणि भारतीय सैन्याचा सामनाही करता येत नाही, अशा विचित्र स्थितीत चीन अडकला आहे. यामुळे कदाचित आणखे एखादे लष्करी साहस करण्याचे प्रयत्न चीनकडून होऊ शकतो, याचीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे सांगून त्यावर चिंता व्यक्त केली. याप्रकरणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे. त्याचवेळी आपल्या लष्करी बळाच्या जोरावर सर्वच शेजारी देशांवर वर्चस्व गाजवू पाहणार्‍या चीनला भारतीय लष्कराने दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तराचे अमेरिकेकडून कौतूक केले जात आहे. या आघाडीवर भारताला मिळणारा आंतरराष्ट्रीय पाठींबाही वाढत चालला आहे. यामुळे चीनची परिस्थिती अधिकाधिक बिकट बनत चालली असून आता भारतीय सैन्य अधिक पुढे येईल, या भीतीने चीनला ग्रासले आहे. यासाठी चीनने लडाखजवळच्या सीमाक्षेत्रात भुसुरूंग पेरून ठेवल्याचा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला आहे.

leave a reply