नवी दिल्ली – लढाऊ विमानांमधील महत्त्वाचा भाग असलेल्या ‘पॉवर टेक ऑफ (पीटीओ) शाफ्ट’च्या स्वदेशी तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी डीआरडीओने घेतली आहे. तेजस विमानावर हे पीटीओ शाफ्ट बसवून चाचणी घेण्यात आली. डीआरडीओने विकसित केलेल्या हाय-स्पीड रोटर तंत्रज्ञानामुळे, असे तंत्रज्ञान असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओचे कौतुक केले आहे. आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
‘लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट-तेजस’ लिमिटेड सीरिज प्रोडक्शन (एलएसपी)-३ विमानावरून पॉवर टेक ऑफ (पीटीओ) शाफ्टची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली. या शाफ्टचे डिझाईन स्वदेशी असून देशातच त्याची निर्मिती करण्यात आली आहे. डीआरडीओच्या चेन्नई स्थित ‘कॉम्बॅट व्हेईकल्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट’ने हा शाफ्ट विकसित केला आहे.
हा शाफ्ट विमानातील एक महत्त्वाचा घटक आहे. भविष्यातील लढाऊ विमानांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा शाफ्ट महत्त्वाचा ठरेल. तसेच कमी खर्चात व कमी वेळेत तो उपलब्ध होईल. डीआरडीओने जटिल हाय-स्पीड रोटर तंत्रज्ञान विकसित करून एक मोठी तांत्रिक उपलब्धी मिळवली आहे.
पीटीओ शाफ्ट ‘फ्रिक्वेंन्सी स्पॅनिंग टेक्नॉलॉजी’सह डिझाइन करण्यात आला आहे. त्यामुळे हा शाफ्ट वेगवेगळ्या इंजिनला गती देण्यास सक्षम आहेे. हा शाफ्ट हलक्या वजनाचा आहे. पीटीओ हा इंजिनपासून गिअरबॉक्सपर्यंत उर्जा वाहून देण्याचे काम करतो. विमानांमध्ये हा शाफ्ट महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्याची देशात निर्मिती करण्यात आल्यास विमानांच्या निर्मितीचा खर्च कमी होईल व अन्य देशावर अवलंबून रहावे लागणार नाही.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पीटीओच्या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओ आणि उद्योगांचे कौतुक केले. या शाफ्टची यशस्वी निर्मिती ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या यशामुळे देशाची संशोधन क्षमता दिसून आली आहे. त्यामुळे विमानांच्या चाचण्यांना सक्रियपणे पाठिंबा मिळेल, असे डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही कामत म्हणाले.