दुसऱ्या देशाशी व्यवहार करताना भारतीय व्यापारी व बँकांना चीनच्या युआनचा वापर टाळण्याची सूचना

नवी दिल्ली – भारतीय व्यापारी व बँकांनी इतर देशांबरोबरील व्यवहार करताना चीनचे चलन युआनचा वापर करू नये, अशी सूचना सरकारने दिली आहे. भारत आणि चीनचे संबंध ताणलेले असल्याने सरकार तसेच रिझर्व्ह बँकेकडून ही सूचना देण्यात आल्याचे दावे केले जातात. या घडामोडीशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. रशियाबरोबरील व्यवहारात युआनचा वापर होण्याची अधिक शक्यता आहे, हे लक्षात घेऊन याविरोधात व्यापारी व बँकांना हा इशारा देण्यात आला आहे.

दुसऱ्या देशाशी व्यवहार करताना भारतीय व्यापारी व बँकांना चीनच्या युआनचा वापर टाळण्याची सूचनालडाखच्या एलएसीवरील भारत व चीनमधील तणाव अजूनही संपुष्टात आलेला नाही. एलएसीवरील हा वाद कायम ठेवून देखील भारत व चीन एकमेकांशी सहकार्य करू शकतात, असे आवाहन चीन करीत आहे. मात्र एलएसीवर हजारो जवान तैनात करून चीन भारताकडून द्विपक्षीय सहकार्याची अपेक्षा ठेवू शकत नाही, असे भारताचे म्हणणे आहे. वेळोवेळी भारताने चीनला याची जाणीव करून दिली. त्यानंतरच्या काळातही चीनच्या भूमिकेत विशेष बदल झालेला नाही. त्यामुळे भारतीय व्यापारी व बँकांना युआनच्या संदर्भात ही सूचना देण्यात आल्याचे दिसत आहे. आवश्यकता भासलीच तर युआनच्या ऐवजी संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दिरहॅम चलनाचा वापर करा, असे भारतीय व्यापारी व बँकांना सुचविण्यात आले आहे.

भारताने घेतलेल्या या निर्णयाला दुसरी बाजू देखील आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरची घसरण होत असताना, पर्यायी चलन म्हणून चीनच्या युआन व भारताच्या रुपयामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. रशियाने फार आधीच चीनबरोबरील व्यापारातून डॉलर वजा करून रुबल व युआनमध्ये व्यवहार सुरू केला होता. युक्रेनच्या युद्धानंतर अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे रशियाने भारताबरोबर रुपया व रुबलमध्ये व्यवहार करण्याचा निर्णय घेतला होता. याचा फार मोठा लाभ भारताला मिळाला असून जवळपास पन्नास देशांनी भारतीय बँकांमध्ये वोस्त्रो अकाऊंट उघडलेली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय चलन म्हणून रुपयाचा पर्याय जगासमोर असल्याचे दिसत आहे.

चीनवर आत्तापर्यंत अनेकवेळा युआनचे मुल्य जाणीवपूर्वक कमी करून दुसऱ्या देशाबरोबरील व्यवहारात लाभ उकळण्याचे आरोप झाले होते. तसेच चीनच्या चलनाशी निगडीत व्यवस्था पारदर्शी नाही, हे देखील वारंवार उघड झाले होते. त्यातच चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर सध्या भयंकर संकटे खडी ठाकली आहेत. निर्यातीवर आधारलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेला जागतिक मंदीचा जबरदस्त फटका बसू शकतो. त्याचवेळी वर्चस्ववादी व विस्तारवादी धोरणांमुळे चीनचे आपल्या क्षेत्रातील जवळपास सर्वच देशांबरोबर गंभीर मतभेद आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या डॉलरची जागा चीनचा युआन घेऊ शकणार नाही. काही देश याला कडाडून विरोध करतील, अशी दाट शक्यता समोर येत आहे.

अशा परिस्थितीत भारताचा रुपया अधिक विश्वासार्ह, सुरक्षित आणि डिजिटल व्यवहारांसाठीही अतिशय सुलभ असल्याने रुपयाचे स्थान चीनच्या युआनपेक्षाही अधिक भक्कम झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत भारताने युआनच्या वापर न करण्याची आपल्या व्यापारी व बँकांना दिलेली सूचना लक्षवेधी बाब ठरते. याआधी भारताने चीनबरोबरील व्यापारासाठी स्थानिक चलनांचा वापर करण्याचा प्रस्ताव चीनला दिला होता. पण भारताबरोबरील व्यापारातून अब्जावधी डॉलर्सची कमाई करणाऱ्या चीनने हा प्रस्ताव त्यावेळी नाकारला होता.

हिंदी English

 

leave a reply