उभरत्या तंत्रज्ञानाकडे लक्ष केंद्रीत करा

- संशोधकांना पंतप्रधानांचे आवाहन

उभरत्या तंत्रज्ञानाकडे लक्षनागपूर – क्वांटम टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, नव्या लसींचा विकास आणि नव्या रोगांवरील संशोधनासारख्या उभरत्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. यासाठी देशाच्या युवावर्गाला प्रोत्साहित करा, असा संदेश पंतप्रधानांनी संशोधकांना दिला. 108 व्या ‘राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस’ला (इंडियन सायन्स काँग्रेस) संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी डेटा आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने गेल्या कही वर्षात केलेल्या चमकदार कामगिरीवर समाधान व्यक्त केले. भारतात मुबलक प्रमाणात असलेल्या या दोन गोष्टी 21 व्या शतकात महत्त्वाच्या ठरतात, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात पाच दिवसांची इंडियन सायन्स काँग्रेस आयोजित करण्यात आली असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधानांनी याच्या उद्घाटन समारोहाला संबोधित केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 2015 साली 130 देशांच्या ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये 81 व्या क्रमांकावर असलेला भारत, 2022 सालात या क्रमवारीत 40 व्या स्थानावर आला आहे. पीएचडी व स्टार्टअप्सच्या संख्येमध्ये आघाडीवर असलेल्या पहिल्या तीन देशात भारताचा समावेश केला जातो. डेटा व तंत्रज्ञान भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. या दोन्ही गोष्टी देशाला नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

डेटाच्या विश्लेषणाचे क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. यामुळे मिळालेल्या माहितीचे रुपांतर अंर्तदृष्टी विकसित करण्यासाठी व विश्लेषणाचे रुपांतर क्रियाशील ज्ञानात करता येते. पारंपरिक ज्ञानापासून ते आधुनिक काळातील तंत्रज्ञानापर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये ही बाब महत्त्वाची ठरते. पुढच्या काळात विज्ञान लॅबमधून अर्थात प्रयोगशाळेतून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे व जनसमान्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे कार्य आपल्याला करावे लागेल, असे सांगून पंतप्रधानांनी यासाठी संशोधकांना आवाहन केले. तसेच संस्थांची उभारणी व गुरुशिष्य परंपरा यामुळे देशाच्या क्रीडाक्षेत्राची झपाट्याने प्रगती झाली. विज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रातही अशा परंपरा सुरू केल्याने ही विकासाची प्रक्रिया अधिक गतीमान होईल, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

यासाठी प्रतिभावान मुलांचा शोधाची प्रक्रिया अर्थात ‘टॅलेंट हंट’ आणि ‘हॅकेथॉन’चा दाखला दिला. यामुळे वैज्ञानिकतेचा कास धरणाऱ्या मुलांची निवड करणे सोपे जाऊ शकेल, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. याबरोबरच देशाची ऊर्जाविषयक मागणी वाढत असताना, राष्ट्रीय हायड्रोजन मिशनवर काम सुरू झालेले आहे. याला यश मिळावे, यासाठी इलेक्ट्रोलायझरसारख्या महत्त्वपूर्ण उपकरणांच्या निर्मितीवर भर देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. नव्या रोगांवर मात करण्यासाठी व नव्या लसी विकसित करण्यासाठी संशोधकांनी तंत्रज्ञानविषयक सहाय्य पुरवावे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

विज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात महिलांची वाढती भागीदारी लक्षात घेता, देशातील महिला व विज्ञान दोघांचाही विकास होत असल्याचे स्पष्ट होते. विज्ञानाचा वापर करून महिलांना सबल करणे एवढेच आपले ध्येय असता कामा नये. तर महिलांच्या सहभागाने विज्ञान अधिक सशक्त करणे हे देखील आपले ध्येय असावे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

leave a reply